७५ टक्के मतदान
By Admin | Updated: July 1, 2015 02:06 IST2015-07-01T02:06:41+5:302015-07-01T02:06:41+5:30
जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३०) जिल्ह्यातील ११०५ केंद्रांवर मतदान झाले.

७५ टक्के मतदान
नावे वगळली : अनेक जण अधिकारापासून वंचित
गोंदिया : जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३०) जिल्ह्यातील ११०५ केंद्रांवर मतदान झाले. रात्री ९ पर्यंत प्राप्त टक्केवारीनुसार सरासरी ७५ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याच्या प्रकारामुळे त्यांना वंचित राहावे लागले. हा प्रकार सोडला तर जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले.
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अशा संवेदनशिल मतदान केंद्रांवरही कोणता अनुचित प्रकार घडला नाही.
जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी रिंगणात २३७ आणि तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी ४२३ असे एकूण ६६० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामीण राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीत मतदानासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. युवा मतदारांपेक्षाही वयोवृद्ध नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यात आघाडीवर होते. विशेष नक्षलग्रस्त भागातही मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही प्रमाणीला प्राधान्य दिले.
बाराभाटी परिसरात नागरिक शेती कामामध्ये जास्त गुंतून असल्याने दुपारी ३ पर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होते. या परिसरात संपूर्ण टक्केवारी काढली असता ७० टक्केपेक्षा कमीच झाल्याचे सांगण्यात आले. नवीन मतदार आणि तरुण मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला. नक्षलग्रस्त संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त चोख होता.
देवीर, सालेकसा या नक्षलग्रस्त तालुक्यांसह आमगाव, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. त्यामुळे तेथील मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत गर्दी होती. बाकी केंद्रांवर सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान असल्याने संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास पुन्हा गर्दी उसळली.
मतमोजणी ६ जुलैला
या निवडणुकीच्या निकालासाठी ६ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी आणखी ५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.