जिल्ह्याला मिळाले ७३ सिमेंट नालाबांध
By Admin | Updated: April 27, 2015 00:33 IST2015-04-27T00:33:28+5:302015-04-27T00:33:28+5:30
प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी या उद्देशातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

जिल्ह्याला मिळाले ७३ सिमेंट नालाबांध
जलयुक्त शिवार अभियान : शासनाच्या विशेष निधीतून होणार बांधकाम
गोंदिया : प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी या उद्देशातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्याला ७३ सिमेंट नालाबांध देण्यात आले आहेत. यासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी देण्यात आला असून त्यातून येत्या जून महिन्यापर्यंत नालाबांध तयार करण्यात येणार आहे.
राज्यात दर २ वर्षानंतर काही भागात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता राज्य शासनाने ‘सर्वांसाठी पाणी-टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्यात ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांना जलयुक्त शिवाराच्या मुख्य संकल्पनेत रूजविण्यासाठी १०० कोटींचा अपेक्षीत खर्च आहे.
पावसाचे जास्तीत जास्त पाणी गाव शिवारातच अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करून पाणी पुरवठ्यात वाढ करणे. भूजल अधिनियमाची अंंमलबजावणी. विकेंद्रीत पाणी साठे तयार करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, हे या अभियानाचे उद्देश आहे. यांतर्गत राज्य शासनाकडून राज्यात सहा हजार सिमेंट नालाबांध तयार करण्यात येणार आहे. यातील ७३ सिमेंट नालाबांध जिल्ह्याला देण्यात आले आहेत.
हे सिमेंट नालाबांध तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून ९.४० कोटींचा विशेष निधी देण्यात आला आहे. याकरिता आवश्यक निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यात आली असून येत्या जून महिन्यापर्यंत हे सिमेंट नालाबांध तयार करण्यात येतील. (शहर प्रतिनिधी)
कृषी व जलसंधारण विभागाकडे जबाबदारी
जिल्ह्यात ७३ सिमेंट नालाबांध तयार करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व लघुसिंचन (जलसंधारण) विभागाकडे देण्यात आली आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने निवड करण्यात आलेल्या गावांतून कोठे या नालाबांधची गरज आहे व संबंधीत संपूर्ण आराखडा तयार करून दिला आहे. यात २३ नालाबांधची जबाबदारी जलसंधारण विभागाकडे देण्यात आली असून यासाठी ३७४.८२ लक्ष रूपये तर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे ५० नालाबांधचे काम देण्यात आले असून यासाठी ५३७.९० लक्ष रूपयांचा निधी अपेक्षीत आहे. अशाप्रकारे ९१२.७२ लक्ष रूपयांच्या या ७३ बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाकडून ९.४० कोटी रूपयांच्या विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
सर्वाधिक नालाबांध गोंदिया तालुक्यात
राज्य शासनाकडून जिल्ह्याला देण्यात आलेल्या ७३ सिमेंट नालाबांधसाठी संबंधित विभागाकडून गावांची निवड करण्यात आली आहे. विभागाने निवड केलेल्या गावांच्या यादीत सर्वाधिक गावे गोंदिया तालुक्यातील दिसून येत आहेत. यादीनुसार, गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक १७ गावे असून त्यानंतर गोरेगाव तालुक्यातील २, तिरोडा तालुक्यातील १९, देवरी तालुक्यातील १०, सडक अर्जुनी तालुक्यातील ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २, सालेकसा तालुक्यातील १५ तर आमगाव तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे.