लपाचे ७२५ प्रकल्प नादुरूस्त

By Admin | Updated: May 21, 2016 01:43 IST2016-05-21T01:43:14+5:302016-05-21T01:43:14+5:30

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार २९३ प्रकल्प आहेत.

725 projects to be executed | लपाचे ७२५ प्रकल्प नादुरूस्त

लपाचे ७२५ प्रकल्प नादुरूस्त

११८८ तलावांना दुरुस्तीची गरज
१७३८ विहिरी लवकरच बांधणार
जिल्ह्यात १४२१ मामा तलाव

नरेश रहिले गोंदिया
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार २९३ प्रकल्प आहेत. त्यापैकी ७२५ प्रकल्प नादुरूस्त आहेत. १९० लघु सिंचन तलावपैकी १०७ नादुरूस्त, २९४ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी ११५ नादुरूस्त, १२ उपसा सिंचनापैकी ९ उपसा सिंचन नादुरूस्त, २६ पाझर तलावांपैकी ६ नादुरूस्त, १३४९ साठवण बंधाऱ्यांपैकी १३३ नादुरूस्त, माजी मालगुजारी १४२१ तलावांपैकी ३५५ तलाव नादुरूस्त असल्याची माहिती संबधित विभागाने दिली. यामुळे सिंचनाच्या सोयी करण्यास लघु पाटबंधारे विभाग कसा उदासीन आहे याची प्रचिती येते.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणारा असला तरी या जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी सोयीस्कर म्हणून माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के मामा तलावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट आहे.
गोंदिया जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी तलावांपैकी ११८८ तलावांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. परंतु दुरूस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी पाणी पुरत नाही. परिणामी हे मामा तलाव हिवाळ्यातच कोरडे पडतात.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १९० लघुसिंचन तलाव, २९४ कोल्हापुरी बंधारे, १२ उपसा सिंचन योजना, २६ पाझर तलाव, १३४९ साठवण बंधारे तर १४२१ माजी मालगुजारी तलाव आहेत. एप्रिल महिन्यात या पैकी २५ टक्के मामा तलावात ३० टक्के पाणी होते. २५ टक्के तलावांमध्ये १० टक्के पाणी तर ५० टक्के तलाव कोरडे पडले होते. आता मे ८० टक्के तलावात थेंबभर पाणी नाही स्थिती झाली आहे.

३९५१ पैकी १६४७ विहिरींचे काम पूर्ण
शासनाने जवाहर विहिरींची योजना सन २००८ मध्ये अमंलात आणली. योजना सुरू झाल्यापासून एप्रिल २०१६ पर्यंत शासनाने गोंदिया जिल्ह्यात ३ हजार ९५१ विहिरी मंजूर केल्या. मात्र यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे गोंदिया जिल्ह्यात फक्त १ हजार ६४७ विहिरींचे काम करण्यात आले. ५६६ विहिरींचे काम सुरू असून १ हजार ७३८ विहिरींच्या बांधकामाची सुरूवात करण्यात आली नाही.

तालुकानिहाय अपूर्ण असलेल्या विहीरी
आमगाव तालुक्यात १४२ विहिरींच्या कामाला सुरूवातच केली नाही. अर्जुनी मोरगाव तालुक्यात २३६, देवरी तालुक्यात १३६, गोंदिया तालुक्यात २५३, गोरेगाव तालुक्यात ४५०, सडक अर्जुनी तालुक्यात १२०, सालेकसा तालुक्यातील १४१, तिरोडा तालुक्यातील २७८ विहिरींच्या कामाला सुरूवातच करण्यात आली नाही. जिल्ह्यात ३९५१ विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी १६४७ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर ५६६ विहिरींचे काम प्रगतिपथावर आहेत. १७३८ विहिरींच्या कामाला सुरूवातच करण्यात आली नाही, हे विशेष.

Web Title: 725 projects to be executed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.