७० टक्के व्यापार राहणार बंद
By Admin | Updated: March 21, 2015 01:59 IST2015-03-21T01:59:12+5:302015-03-21T01:59:12+5:30
समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. तसेच समाज, धर्म व आराध्य देवाप्रती आपली श्रद्धा समर्पीत रहावी हे मुख्य ध्येय बाळगून येथील सिंधी ....

७० टक्के व्यापार राहणार बंद
गोंदिया : समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. तसेच समाज, धर्म व आराध्य देवाप्रती आपली श्रद्धा समर्पीत रहावी हे मुख्य ध्येय बाळगून येथील सिंधी पंचायतच्यावतीने आराध्य दैवत झुलेलाल चेट्रीचंड दिनानिमित्त शहरातील समस्त सिंधी समाजबांधवांनी आजच्या दिवशी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सिंधी समाजातील प्रमुख संस्था सिंधी नवयुवक मंडळाकडून आवाहन करण्यात आले असून समाजातील सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानांत दुकान बंद ठेवली जाणार असल्याचे स्टिकर्स लावले आहेत.
आजच्या युगात कुणालाही समाज व समाजबांधव वा आपल्या आराध्य देवी- देवतांसाठी वेळ उरलेला नाही. मॉडर्न म्हणविणाऱ्या या युगाची ही व्यथा आहे. फक्त पैसा कमविणे व आपल्या परिवारापुरते जीवन जगणे हे आजचे ध्येय राहिले आहे. अशात मात्र कधीतरी काही अडचण आल्यास पैशापेक्षा हा समाजच धावून येतो हे तेवढेच वास्तव्य आहे. हीच वास्तविकता आपल्या समाजबांधवांच्या नेहमी लक्षात रहावी यासाठी येथील सिंधी समाजाने एक वेगळीच युक्ती शोधली. त्याचे असे की, साई झुलेलाल सिंधी समाजाचे आराध्य दैवत असून त्यांचा जयंती दिवस सिंधी समाजासाठी अत्यंत अमूल्य दिवस असतो. माणूस त्या देवाच्या आशिर्वादानेच नाव, पैसा व मानसन्मान मिळवितो. असे असतानाही कित्येक जणं आपल्या देवा करिता एक दिवस देण्यासाठी पुढे येत नसतात.
ही बाब लक्षात घेत सिंधी नवयुक मंडळाने झुलेलाल यांच्या जयंती दिनी एकही समाजबांधव आपले दुकान उघडणार नाही असे आवाहन केले आहे. मागील कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा असून त्या दिवशी समाजबांधव समाजाच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला हा दिवस देवाच्या सेवेत लावतात. शहरात आज प्रत्येक क्षेत्रात सुमारे ७० टक्के व्यापारी सिंधी समाजातले आहेत. त्यामुळे झुलेलाल जयंती उत्सव दिनी शहरातील सिंधी समाजबांधवांची सर्वच दुकाने बंद राहतील. (जिल्हा प्रतिनिधी)