७ दिवसात साडेचार हजार बाधितांनी कोरोनाला हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST2021-04-26T04:26:11+5:302021-04-26T04:26:11+5:30
गोंदिया : सध्या सर्वत्र कोराेनाने थैमान घातले आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता चाचण्यांचे प्रमाणसुध्दा वाढविण्यात आले आहे. ...

७ दिवसात साडेचार हजार बाधितांनी कोरोनाला हरविले
गोंदिया : सध्या सर्वत्र कोराेनाने थैमान घातले आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता चाचण्यांचे प्रमाणसुध्दा वाढविण्यात आले आहे. मागील सात दिवसात जिल्ह्यात ४,७५२ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४,५८२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सात दिवसात साडेचार हजारावर बाधितांनी कोरोनाला हरविल्याचे दिलासादायक चित्र आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. मात्र यंदा त्यापेक्षा ही बिकट परिस्थिती आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून बाधितांचा ग्राफ सातत्याने उंचावत आहे. रुग्ण वाढीचा तीन आकडी पाढा कायम आहे. त्यामुळेच आतापर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या २९ हजारावर पोहचली आहे. १८ ते २४ दरम्यान जिल्ह्यात ४७५२ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ४५८२ बाधितांनी कोरोनावर मात केली. तर तब्बल १२२ बाधितांचा खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्येत जरी वाढ दिसत असली तर रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने जिल्हावासीयांना दिलासादेखील मिळाला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णांमध्येसुध्दा कोरोनासंदर्भात जागरूकता निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच नागरिक चाचणी करण्यासाठी स्वत:हून पुढे येत असल्याचे चित्र आहे.
.......
चाचणी केंद्र वाढविण्याची गरज
गोंदिया शहराची लोकसंख्या दीड लाखावर आहे. तर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया शहर आणि तालुक्यातच आहे. मात्र नगर परिषदेने शहरात केवळ चार आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन चाचणी केंद्र सुरू केेले आहेत. या केंद्रावर केवळ एका दिवशी केवळ चाळीस नमुने घेतले जात आहे. त्यामुळे चाचण्या करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन नगर परिषदेने चाचणी केंद्राची संख्या वाढविण्याची गरज आहे.
...........
किटचा पुरवठा वाढवा
कोरोना चाचण्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र शहरातील कोरोना चाचणी केंद्रावर रॅट किटचा तुटवडा आहे. त्यामुळे चाचण्या करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना चाचणी केंद्राना रॅट किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.
..........
कोरोना चाचणी केंद्रावर दक्षतेचा अभाव
गोंदिया शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून सध्या चार कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने कुठलीच खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. नमुने घेण्यासाठी ज्या खुर्चीवर बसविले जाते त्या खुर्चीचे सुध्दा सॅनिटायझेशन केले जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
........
असा आहे कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख
१८ एप्रिल : ५७६, १९ एप्रिल : ६६३, २० एप्रिल : ६१२, २१ एप्रिल ७४५, २२ एप्रिल : ५८१, २३ एप्रिल ७४२, २४ एप्रिल : ६६३
......