आठ ग्रा.पं.त ६६ टक्के मतदाननागऱ्यात गडबड : गोंदियाची टक्केवारी उशिरापर्यंत गुलदस्त्यात
By Admin | Updated: April 23, 2015 00:31 IST2015-04-23T00:31:25+5:302015-04-23T00:31:25+5:30
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ठरलेल्या गोंदिया तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या ..

आठ ग्रा.पं.त ६६ टक्के मतदाननागऱ्यात गडबड : गोंदियाची टक्केवारी उशिरापर्यंत गुलदस्त्यात
गोंदिया : जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ठरलेल्या गोंदिया तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ६६.६६ टक्के मतदान झाले. यासोबतच जिल्ह्यातील इतर आठ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका झाल्या. यादरम्यान कुठेही कोणती गडबड झाली नसली तरी त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
गोंदिया तालुक्यातील खमारी, फुलचूर, फुलचूरटोला, चुटिया, घिवारी, कटंगटोला, नागरा व हिवरा या आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० हजार मतदार पात्र होते. याशिवाय ढाकणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३.मुंडीपार (ढा.) प्रभाग ३, किन्ही प्रभाग १, देवूटोला प्रभाग २, गोरेगाव तालुक्यातील कमरगाव प्रभाग क्र.३, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुर्रा प्रभाग क्रमांक २, बाकटी प्रभाग क्र.२ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी (ख.) प्रभाग क्र.२ येथे ग्रामपंचायत प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.
सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदारांमध्ये मतदानासाठी चांगला उत्साह दिसून आला. सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर केली होती. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असणाऱ्यांनी या निवडणुकीत अधिक सक्रिय होऊन आपल्या कार्यकर्त्यांना कामी लावल्याचे दिसून येत होते. अनेक ठिकाणी तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नववधुने बजावला मतदानाचा हक्क
फूलचर ग्रामपंचायत क्षेत्रात एका नवविवाहितेने सासरी जाण्यापूर्वी माहेरच्या नावावरील आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यात योगदान दिले. सीमा नागपुरे या तरुणीचा विवाह झाल्यामुळे यापुढे तिचे नाव सासरकडील नवीन मतदार यादीत जोडले जाणार आहे. त्यामुळे माहेरील नावाने असलेला मतदानाचा शेवटचा हक्क बजावण्याची संधी तिने सोडली नाही.
आज मतमोजणी
आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि आठ प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर गुरूवारी (दि.२३) सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यात गोंदिया तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची मतमोजणी गोंदिया तहसील कार्यालय (बॅडमिंटन हॉल), तर इतर पोटनिवडणुकींसाठी सडक अर्जुनी तहसील कार्यालय, गोरेगाव तहसील कार्यालय, अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.
नागऱ्यातील नागरिकांनी केली तक्रार
नागरा ग्रामपंचायतीत बुधवारी मतदानादरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर काही लोकांनी आक्षेप घेतला. अंगणवाडी सेविका नागरीकर, पोरवार वॉर्ड क्र.३ मध्ये घरोघरी जात असल्याचे पाहून काही लोकांनी आता कोणता सर्व्हे करीत आहात असे विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अंगणवाडी सेविका नागरीकर एका उमेदवाराच्या वहिणी आहेत. त्यामुळे त्या घरोघरी जाऊन मतदारांना फूस लावत होत्या, असा आरोप करीत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.