३९ पोलीस पदांसाठी ६३४१ उमेदवारांचे अर्ज
By Admin | Updated: March 22, 2017 01:10 IST2017-03-22T01:10:35+5:302017-03-22T01:10:35+5:30
जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४४ पोलीस शिपाई पदाच्या जागा असल्या तरी

३९ पोलीस पदांसाठी ६३४१ उमेदवारांचे अर्ज
आजपासून शारीरिक चाचणी : ४८ कॅमेरे ठेवणार भरतीवर नजर
गोंदिया : जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४४ पोलीस शिपाई पदाच्या जागा असल्या तरी यापैकी पाच जागा अनुकंपावरील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या ३९ जागांसाठी तब्बल ६ हजार ३४१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी २२ मार्चपासून सुरू होणार आहे.
प्रभारी पोलीस अधीक्षक राकेशचंद्र कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात सदर भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. ३९ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी असून या जागांसाठी १ हजार २४१ महिलांनी अर्ज केले आहे. २८ पुरूषांच्या जागांसाठी ५ हजार १०० पुरूषांनी अर्ज केले आहे.
या भरती प्रक्रीयेसाठी खुल्या प्रवर्गाला ३५० रूपये तर आरक्षण असलेल्या प्रवर्गाला २०० रूपये शुल्क आहे. बुधवारी सकाळी ५ वाजतापासून पोलीस मुख्यालय कारंजा येथील प्रांगणात शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. नवीन बायपास रस्त्यावर १६०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल. तसेच लांब उडी, उंच उडी १०० मीटर धावणे व पुलअप्स हे मुख्यालयात घेण्यात येणार आहे.
या भरतीवर करडी नजर ठेवण्यासाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे तर २२ व्हिडीओ कॅमेरे बसविले आहेत. शारीरिक चाचणीत चांगले गुण घेणाऱ्या उमेदवारांमधून एका पदामागे १५ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले जाईल. बारावी उत्तीर्ण ही या भरती प्रक्रियेची शैक्षणिक पात्रता आहे. (तालुका प्रतिनिधी)
५०६ अधिकारी-कर्मचारी करणार बंदोबस्त
या पोलीस भरती प्रक्रियेसाठी ६५ अधिकारी तर ४४३ कर्मचारी बंदोबस्त करणार आहेत. यात एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक, तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २३ सहायक पोलीस निरीक्षक, २१ उपनिरीक्षक, ४०८ पोलीस कर्मचारी, तर ३५ लिपीक वर्गातील कर्मचारी या भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.