सहा हजार कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी
By Admin | Updated: October 9, 2014 23:03 IST2014-10-09T23:03:50+5:302014-10-09T23:03:50+5:30
येत्या १५ आॅक्टोबर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध विभागांतील सुमारे सहा हजार १८९ अधिकारी

सहा हजार कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी
गोंदिया : येत्या १५ आॅक्टोबर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध विभागांतील सुमारे सहा हजार १८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीसाठी शिक्षकांना सामावून घेतले असतानाच मात्र महिलांना यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे.
येत्या १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव-तिरोडा, आमगाव-देवरी व सडक अर्जुनी- अर्जुनी मोरगाव या चार विधानसभा क्षेत्रांचीही निवडणूक पार पडेल. निवडणुक म्हटली की, तेथे मनुष्यबळ आलेच व त्यासाठी निवडणूक विभागाची मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू आहे.
या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने जिल्ह्यातील सर्वच केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, अनुदानित शाळा, महावितरण सारख्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी मागविली. त्यातील सुमारे सहा हजार १८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांची इलेक्शन ड्यूटी लावली आहे.
यात गोंदिया, गोरेगाव-तिरोडा व सडक अर्जुनी- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी चार हजार ५७६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या तीन हजार १८७ कर्मचारी(जि.प.शिक्षकांसह), एक हजार ३१७ अनुदानित शाळा शिक्षक, १३ केंद्र शासनाचे कर्मचारी व ५९ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
तर आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रासाठी एक हजार ६१३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या एक हजार २३८ कर्मचारी (जि.प.शिक्षकांसह), ३५९ अनुदानित शाळा शिक्षक व १६ वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने एकूण सहा हजार १८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली आहे.
विशेष म्हणजे निवडणुकीच्या कामांसाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने यंदा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट दिली आहे. (शहर प्रतिनिधी)