६० टक्के पदांची धुरा महिलांच्या खांद्यावर
By Admin | Updated: March 8, 2016 02:05 IST2016-03-08T02:05:14+5:302016-03-08T02:05:14+5:30
आपल्या समाजात स्त्रीला दुर्गा, लक्ष्मी, काली, चंडिका अशी एक ना अनेक शक्तीचे अवतार मानून पूजा केली जाते. परंतु तरीही

६० टक्के पदांची धुरा महिलांच्या खांद्यावर
विजय मानकर ल्ल सालेकसा
आपल्या समाजात स्त्रीला दुर्गा, लक्ष्मी, काली, चंडिका अशी एक ना अनेक शक्तीचे अवतार मानून पूजा केली जाते. परंतु तरीही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला कमजोर ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सालेकसासारख्या आदिवासीबहुल आणि मागास तालुक्यात राजकीय क्षेत्रासह अनेक पदांची जबाबदारी महिला यशस्वीपणे सांभाळताना दिसत आहेत.
राजकीय क्षेत्राचा विचार केल्यास चार जि.प. क्षेत्रामध्ये फक्त एक पद महिला राखीव होते. परंतु दोन महिला निवडून आल्या. चार पं.स. क्षेत्र राखीव असताना पाच महिला निवडून आल्या. तसेच तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती आहेत. त्यातील २१ ठिकाणी महिला सरपंचपद राखीव आहे. मात्र इतर सर्वसामान्य ठिकाणीसुद्धा सरपंचपदावर अनेक महिला आपली कौटुंबिक जबाबदारी, घर सांभाळाून ग्राम पंचायतीची धुरा यशस्वीरित्या सांभाळताना आढळून येते.
शाळेच्या मुख्याध्यापकपदापासून शिक्षिका, बाई ते अंगणवाडी सेविका आणि पोलीस अधिकारी ते पोलीस शिपाई, बँकेतील कर्मचारी असो किंवा शासकीय कार्यालयातील सहायक, प्रत्येक पदावर यशस्वी जबाबदारी पाडताना महिला वर्ग दिसून येत आहे. त्यांची कामे पाहून सालेकसासारख्या मागासलेल्या तालुक्यातील अनेक महिला प्रेरणा घेत घराबाहेर पाऊल ठेवून विविध क्षेत्रात आपली सेवा देण्यासाठी पुढे येत आहेत.
बचतगटाच्या माध्यमातून विविध उपक्रम चालवित व आर्थिक विकास घडवून आणणारी कामे करताना या तालुक्यात स्त्रीयांनी मोठी क्रांती घडवून आणल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या कामात सुरुवातीपासूनच तसेच व्यवसायात घरची महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला काम करीत आहे. या व्यतिरिक्त ग्राम पंचायतीच्या प्रभाग सदस्याच्या पदापासून सरपंच, पं.स. सदस्य, सभापती, उपसभापती, जि.प. सदस्य ते विद्यमान जि.प.अध्यक्ष पदावर या तालुक्यातील यशस्वी धुरा सांभाळताना दिसत आहे.
मागील जि.प. निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या एकूण चार जागापैकी एक जागा महिलांसाठी राखीव होती. त्या जागेवर लता दोनोडे या महिलेने आपल्या प्रभावाचा ठसा उमटविला. दणदणीत विजय संपादन केला. एवढेच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान मिळविला. पिपरीयाची जागा सर्वसामान्यसाठी खुली असून या जागेवर दुर्गाबाई तिराले ह्या दिग्गज पुरुषांना चारही मुंड्या चित करुन निवडून आल्या. पं.स. निवडणुकीत ही खुल्या जागेवर झालीया क्षेत्रातून प्रतिभा परिहार या महिलेने पुरुषांची मक्तेदारी संपवत महिलांना संघटित करुन जबरदस्त मुसंडी मारली होती. उपसभापतीपदावर राजकुमारी विश्वकर्मा ही महिला आपली जबाबदारी निर्विवाद सांभाळत आहे. या आधी पं.स. सभापती म्हणून छाया बल्हारे, मालन घासले, कांता टेंभरे या महिलांनी आपल्या विवेक बुद्धीने पदाची धुरा सांभाळली.
सालेकसा तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती असून त्यापैकी २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला आरक्षणाच्या आधारावर पदावर आल्या, परंतु इतर चार ठिकाणी महिलांनी आपल्या भरोशावर सरपंचपद प्राप्त केले. त्यामुळे एकूण २५ ग्राम पंचायतीची धुरा स्त्रीया यशस्वीरित्या सांभाळताना दिसत आहेत. यात कावराबांध परिसरातील १० गावांमध्ये फक्त महिला सरपंच कार्यरत आहेत.
तालुक्यात ४१ पैकी कावराबांध, कोटजमुरा, पोवारीटोला, नवेगाव, बाम्हणी, लटोरी, बिंझली, मुंडीपार, नानव्हा, निंबा, कहाली, कोसमतर्रा, दरेकसा, टोयागोंदी, तिरखेडी, बिजेपार, कडोतीटोला, कोटरा, कारुटोला, गांधीटोला, मक्काटोला, रोंढा, गिरोला, सातगाव, भजेपार येथील ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आपली जबाबदारी सांभाळत असून प्रत्येक ठिकाणी महिला सदस्य सुद्धा आपआपल्या वॉर्डात, प्रभाग सदस्यांची जबाबदारी सांभाळत जनसमस्या सोडविण्यात लक्ष घालीत असतात. अशा अनेक महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
लटोरीत महिला कुटुंब प्रमुख !
४ लटोरी या गावात तर प्रत्येक घरी स्त्रीया कुटुंब प्रमुखाची जबाबदारी सांभाळत असून प्रत्येक घराच्या दारावर कुटुंब प्रमुख म्हणून महिलेच्या नावाची पाटी लावलेली आहे. येथे ग्रामपंचायतमध्ये ही कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नोंद सर्वात वर आहे.
४ सालेकसा येथील रीना कदम नावाची एक कणखर महिला दोन मुलांची आई असून ती मुलांची आई-वडील, तर आपल्या आई-वडिलासाठी मुलगा-मुलगी अशा कुटुंबातील अनेक जबाबदाऱ्या सांभाळत विद्या निकेतन कान्व्हेंटमध्ये मुख्याध्यापिका पदाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळत आहे.