जिल्ह्यातील ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:25+5:302021-02-05T07:49:25+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आता शमलेला असून, स्थिती नियंत्रणात आली आहे. घटलेल्या दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत ...

जिल्ह्यातील ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आता शमलेला असून, स्थिती नियंत्रणात आली आहे. घटलेल्या दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत आहे. अशात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील क्रियाशील रुग्णांची संख्या १०च्या आत आली आहे. यामुळे आता हे ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शनिवारपर्यंत १४,१८७ पार झाली असून, दररोज थोड्याफार प्रमाणात का होईना, नवीन बाधितांची भर पडत आहे. यावरून आता जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत आहे, हेसुद्धा तितकेच खरे आहे. शिवाय जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत १३,८७८ रुग्णांनी कोरोनावर मात दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यात १२७ क्रियाशील रुग्ण उरले आहेत. विशेष म्हणजे, दररोज येणाऱ्या आकडेवारीत १५ - २०च्या आतच नवीन बाधितांची नोंद घेतली जात आहे. त्या तुलनेत कोरोनावर मात करणारे जास्त येत असल्याने क्रियाशील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सालेकसा, देवरी, सडक - अर्जुनी व अर्जुनी - मोरगाव तालुक्यात १०च्या आत क्रियाशील रुग्ण दिसून येत आहेत. यावरून नवीन बाधितांची संख्या अशीच कमी राहिल्यास लवकरच हे तालुके कोरोनामुक्त होणार यात शंका नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, गुरुवारी (दि. २८) जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण निघाला नव्हता. यावरून जिल्ह्यात कोरोना नक्कीच नियंत्रणात येणार हे स्पष्ट आहे.
-------------------------------------
६४ रुग्ण घरीच अलगीकरणात
जिल्ह्यात सध्या १२७ रुग्ण क्रियाशील असून, जिल्हावासियांसाठी ही बाब नक्कीच आनंदाची ठरत आहे. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे, क्रियाशील रुग्णांमध्ये ६४ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. म्हणजेच त्यांची प्रकृती बरी असून, फक्त उपाययोजना म्हणून त्यांना निगराणीत ठेवण्यात आले आहे. ही संख्या अशीच झपाट्याने कमी होत गेल्यास येत्या काही काळात अवघा जिल्हा कोेरोनावर मात करून मुक्त होणार असे चित्र आहे.
---------------------------
उपाययोजनांकडे दुर्लक्ष नकोच
तोंडावर मास्क लावणे, शारीरिक अंतर व स्वच्छता या तीन शस्त्रांमुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आला आहे. मात्र, अशात आता अतिरेक न करता जिल्हावासीयांनी उपाययोजनांचा आपल्या दैनंदिन जीवनात पुढेही अंमल करणे गरजेचे आहे. यामुळेच आता यापुढेही तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन तसेच स्वच्छता ही जीवनातील अविभाज्य बाब बनविण्याची गरज आहे.