जिल्ह्यात ५.७२ लाख खाते संगणीकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:37 IST2017-04-07T01:37:26+5:302017-04-07T01:37:26+5:30
वडिलांच्या संपत्तीमध्ये मुला-मुलींचा समान वाटा आहे. या ग्रामसभेच्या माध्यमातून वारसान फेरफार, संपत्तीक

जिल्ह्यात ५.७२ लाख खाते संगणीकृत
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रथम महसुली ग्रामसभा उत्साहात
गोंदिया : वडिलांच्या संपत्तीमध्ये मुला-मुलींचा समान वाटा आहे. या ग्रामसभेच्या माध्यमातून वारसान फेरफार, संपत्तीक हिस्सेवाटणी, वर्ग २ ची जमीन वर्ग १ करणे, लक्ष्मी मुक्ती योजना यावर निर्णय घेण्यात येतील. सर्वांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. संपत्तीमध्ये मुलीचे नाव नोंद झाल्यामुळे संपत्तीचे संरक्षण होईल. जिल्ह्यातील पाच लाख ८० हजार खातेदारांपैकी पाच लाख ७२ हजार खाते संगणीकृत झाल्यामुळे महाराष्ट्रात सातबारा संगणीकृत झाल्यामुळे गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महसुली ग्रामसभा आयोजित करण्याचा वेळापत्रक जिल्हाधिकारी यांनी जाही केला. त्यानुसार मुरदोली ग्रामपंचायतची प्रथम महसुली सभा घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सभेत मार्गदर्शक म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, नायब तहसीलदार एम.एन. वेदी, सरपंच शसेंद्र भगत, पं.स. सदस्य अलका काटेवार, पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, १ मेनंतर सर्व कास्तकारांना संगणीकृत सातबारा देण्यात येईल. यानंतर शेतजमिनीमध्ये असलेल्या प्रौढ झाडांचे संरक्षण करण्याकरिता शेतकऱ्यांना निधी देण्याचा विचार सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील मालगुजारी तलावांच्या संरक्षणाकरिता शासनस्तरावर त्यांची मोजणी करून त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. तलावातील गाळ काढल्यानंतर पुन्हा गाळ साचणार नाही, याचेही नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले, प्रत्येक मनुष्याला आपले जीवन सुखकर व्हावे, असे वाटते. त्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांनी स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या बाबींकडे अग्रक्रमाने लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगितले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. गावकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. महसुली प्रास्ताविक तहसीलदार कल्याणकुमार डहाट व ग्रामसभेचे प्रास्ताविक सरपंच शसेंद्र भगत यांनी मांडले.
संचालन पोलीस पाटील दिलीप मेश्राम यांनी केले. आभार किशोर मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसेवक आर.एन. बहेकार, रोशन कटरे, हरिचंद धुर्वे, मदनलाल भेंडारकर, हरिचंद पटले, के.एम. पटले आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)