भारत बटालियनच्या ५४ जवानांनी केले रक्तदान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:52+5:302021-07-05T04:18:52+5:30
गोंदिया : स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ जुलैदरम्यान ...

भारत बटालियनच्या ५४ जवानांनी केले रक्तदान ()
गोंदिया : स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ जुलैदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले आहे. याच अंतर्गत गाेंदिया तालुक्यातील बिरसी येथील भारत बटालियनच्या कॅम्पमध्ये शनिवारी (दि.३) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. लोकमत समूह आणि भारत बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकूण ५४ जवानांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
कोविड संकटाच्या वेळी फ्रन्टलाइन योद्धे म्हणून डॉक्टरांसह समर्थपणे व सर्व शक्तीने महाराष्ट्र पोलीस विशेषत: राज्य राखीव पोलीस बलाने कठोर परिश्रम घेतले. कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या रक्ताच्या टंचाईमुळे पोलिसांनो रक्तदानात सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले होते. ‘लाेकमत समूहा’ने कोविड संकटकाळात निर्माण झालेल्या रक्ताच्या टंचाईवर मात करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. याच उपक्रमात सहभागी होत भारत राखीव बटालियन-२, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १५, बिरसी येथे ५४ जवानांनी रक्तदान केले. गोंदिया येथील लोकमान्य ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले. बटालियनचे कमांडंट जावेद अन्वर यांनी स्वेच्छेने रक्तदान करून पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मनोबल वाढविले. पोलीस अंमलदार विकास कावळे यांच्या पत्नी प्रियंका विकास कावळे व उदय फुलझेले यांच्या पत्नी किरण उदय फुलझेले यांनीसुद्धा प्रेरित होऊन स्वेच्छेने रक्तदान केले. शिबिरासाठी समादेशक सहायक संजय साळुखे, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण हिरपूरकर, वैद्यकीय अधिकारी कोकुर्डे, पोलीस कल्याण अधिकारी सुनील चव्हाण, सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार व लाेकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार यांनी सहकार्य केले.