जिल्ह्यात तीन वर्षांत ५३ मातांचा मृत्यू

By Admin | Updated: July 13, 2015 01:27 IST2015-07-13T01:27:45+5:302015-07-13T01:27:45+5:30

जिल्ह्यात केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, गंगाबाई महिला रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयासह एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत.

53 mothers die in three years in the district | जिल्ह्यात तीन वर्षांत ५३ मातांचा मृत्यू

जिल्ह्यात तीन वर्षांत ५३ मातांचा मृत्यू

समस्या आरोग्याची : दोन महिन्यांत चार मातांचा मृत्यू
देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्यात केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, गंगाबाई महिला रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयासह एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांचा अभाव म्हणा किंवा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे आरोग्याची समस्या नेहमीच आवासून उभी असते. हेच कारण आहे की, मागील तीन वर्षांत जिल्ह्यात ५३ मातांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे.
सदर मातामृत्यू आर्थिक वर्ष २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ मधील असून या मृत्यू प्रसूतीपूर्वी, प्रसूतीप्रसंगी व प्रसूतीनंतरच्या आहेत. यास सन २०१२-१३ मध्ये सर्वाधिक म्हणजे एकूण २३ मातामृत्यू झाल्या आहेत. यात गोंदिया तालुक्यात नऊ, गोरेगाव चार, आमगाव एक, सालेकसा तीन, देवरी दोन, सडक-अर्जुनी दोन व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एका मातेच्या मृत्यूचा समावेश आहे. सन २०१३-१४ मध्ये एकूण १५ मातामृत्यू झाल्या आहेत.
यात गोंदिया तालुक्यात चार, गोरेगाव दोन, आमगाव एक, देवरी चार, सडक-अर्जुनी एक व अर्जुनी-मोरगाव एक व तिरोडा तालुक्यात दोन मातामृत्यूचा समावेश आहे. तर सन २०१४-१५ मध्ये एकूण १२ मातामृत्यू झाल्या आहेत. यात गोंदिया तालुक्यात चार, गोरेगाव तीन, आमगाव एक, सडक-अर्जुनी दोन व तिरोडा तालुक्यात दोन मातामृत्यूंचा समावेश आहे.
एवढेच नव्हे तर सन २०१५ च्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण चार मातामृत्यू झाल्या आहेत. यात गोंदिया तालुक्यात दोन, तिरोडा एक व सालेकसा तालुक्यातील एका मातेच्या मृत्यूचा समावेश आहे.
वर्षभरात ५५० बालमृत्यूंची नोंद
आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये जिल्हाभरात ५५० बालमृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे. यापैकी ग्रामीण भागात २६९ तर शहरी भागात २८१ बालमृत्यूचा समावेश आहे. यात ० ते सात दिवस वयोगटातील ग्रामीण भागातील ९१ व शहरी भागातील २३९ बाळांचा समावेश आहे. तर आठ ते २८ दिवस वयोगटातील ग्रामीण भागातील ५१ व शहरी भागातील ३३ बाळांचा समावेश असून एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ग्रामीण भागातील ७० व शहरी भागातील सहा तसेच एक ते सहा वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ५७ व शहरी भागातील तीन बालमृत्यूचा समावेश आहे.
एप्रिल व मे महिन्यांत ४८ बालमृत्यू
सन २०१५ च्या एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ४८ बालमृत्यूचे प्रकरण घडले. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील एकूण १२ व शहरी भागातील १७ बालमृत्यूचा समावेश आहे. यात ० ते सात दिवस वयोगटातील ग्रामीण पाच व शहरी १४, आठ ते २८ दिवस वयोगटातील ग्रामीण एक व शहरी तीन, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ग्रामीण दोन व एक वर्ष ते सहा वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील चार बालमृत्यूंचा समावेश आहे. तसेच मे महिन्यात एकूण १९ बालमृत्यू घडले. यात शहरी भागात नऊ तर ग्रामीण भागात १० बालमृत्यूचा समावेश आहे. यात ० ते सात दिवस वयोगटातील ग्रामीण दोन व शहरी आठ, आठ ते २८ दिवस वयोगटातील शहरी दोन, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ग्रामीण चार व एक वर्ष ते सहा वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील तीन बालमृत्यूचा समावेश आहे.

Web Title: 53 mothers die in three years in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.