तलावांत ५० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 01:54 IST2016-09-02T01:54:03+5:302016-09-02T01:54:03+5:30

पूर्वीपासून जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिल्ह्यात शेकडो लहान-मोठे तलाव आहेत

50% water reservoir in ponds | तलावांत ५० टक्केच जलसाठा

तलावांत ५० टक्केच जलसाठा

पाणीसाठ्यात घट : मासेमारी व्यवसाय ठप्प
रावणवाडी : पूर्वीपासून जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिल्ह्यात शेकडो लहान-मोठे तलाव आहेत व या तलावांच्या भरवशावरच ढिवर समाजाचा मासेमारी व्यवसाय चालत असतो. परंतु आतापर्यंत तलाव पावसाच्या पाण्याने भरलेच नसल्यामुळे पिढीजात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ढिवर समाजावर संकट उभे ठाकले आहे.
पिढ्यानपिढ्या मासेमारी करणारा भोई ढिवर समाज शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे हा समाज आणि त्याच्या व्यवसायाच्या अस्तीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ढिवर समाजाकडे चरितार्थासाठी पर्यायी व्यवसाय करण्याची व्यवस्था नसल्यामुळे ढिवर समाजावर उपासमारीची पाळी आहे. शासनाने जिल्ह्यातील सिंचनाच्या सुविधेकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही. पण मस्त्य व्यवसायासाठीही आवश्यक ती उपाययोजना केलीच नाही. त्यामुळे सर्वत्र मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात लहान-मोठे तलाव अस्तीत्वात आहेत. परंतु आतापर्यंत या तलावांमध्ये पावसाचे पाणी भरलेच नाही. त्यातही शेतीला पाण्याची आवश्यकता वाटली तर काही दिवसांतच ते ही कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत.
शासनाने तालुक्यातील प्रत्येक तलावात जास्तीतजास्त पाण्याची साठवण व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. तलावांची खोली व पाणी टिकून राहण्याची घनता यावर मासोळ्याचे उत्पादन अवलंबून असते, मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव व बोड्या अर्धवटच भरल्या असल्यामुळे याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झालेला दिसून येत आहे.(वार्ताहर)

Web Title: 50% water reservoir in ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.