जोडप्यांना ५० हजार रुपये देणार
By Admin | Updated: May 4, 2017 01:00 IST2017-05-04T01:00:41+5:302017-05-04T01:00:41+5:30
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचे काम आहे.

जोडप्यांना ५० हजार रुपये देणार
राजकुमार बडोले : सामूहिक सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्यांसाठी प्रयत्न
गोंदिया : सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचे काम आहे. सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनामुळे समाजात सामाजिक समता निर्माण होते. अशाप्रकारच्या विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्यांसाठी सध्या १० हजार रु पये देण्यात येत आहेत. त्यामध्ये वाढ करु न ते आता २० हजार रूपये करण्यात आले आहे. त्यापुढेही विचार करून भविष्यात ५० हजार रु पये देण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सोमवार (दि.१) रोजी भीमघाट स्मारक समिती गोंदियाच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पुणे येथील अशोक सर्वांगिण विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक शीलवंत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प. सदस्य विश्वजित डोंगरे, पंचायत समिती सभापती श्याम गणवीर, नगरपरिषद सदस्य भागवत मेश्राम व कुंदा पंचबुध्दे, समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांची उपस्थिती होती.
जाती तोडो आंदोलनाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून झाल्याचे सांगून बडोले पुढे म्हणाले, जाती तोडो आंदोलनाचा महत्वाचा तोडगा आंतरजातीय विवाह करणे हा आहे. विवाह हे पवित्र बंधन आहे. एकमेकांना समजून घेवून जीवनाचा गाडा सुख दु:खात एकमेकांच्या सहकार्याने ओढला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करून नवदाम्पत्यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.
या वेळी नगराध्यक्ष इंगळे म्हणाले, सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनामुळे वधू पित्याची आर्थिक बचत होते. सामूहिक विवाह पध्दती ही आदर्श असून भविष्यात युवक-युवतींनी अशाप्रकारच्या सोहळ्यातूनच विवाहबध्द झाले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी रतन वासनिक यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवदाम्पत्यांना जीवनावश्यक वस्तू भेट स्वरूपात डिनर सेट व टेबल फॅन वितरित करण्यात आले. प्रास्ताविक भीमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे यांनी मांडले. संचालन अनिल रामटेके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार लक्ष्मीकांत डहाट यांनी मानले. कार्यक्रमास नवदाम्पत्यांचे नातेवाईक तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पाच लाख मिळण्यासाठी प्रयत्नशील
भीमघाट स्मारक समितीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून आदर्श निर्माण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या स्मारक समितीला एक कोटी रु पये मंजूर केले आहे. हा निधी कमी पडल्यास आणखीही निधी देण्यात येईल. विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेला १० हजार रूपये प्रती जोडपे याप्रमाणे मदत करण्याचा विचार आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी पाच लाख रूपये प्रोत्साहन मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.