५० रुपयात करा वाहन प्रदूषणमुक्त!
By Admin | Updated: January 31, 2015 01:47 IST2015-01-31T01:47:32+5:302015-01-31T01:47:32+5:30
आपल्याकडील वाहन धूर फेकत आहे? वाहनात रॉकेलचा वापर करता म्हणून ते प्रदूषण पसरवीत आहे? एवढेच काय, पण आपल्याकडील वाहन भंगारमध्ये पडून आहे?

५० रुपयात करा वाहन प्रदूषणमुक्त!
मनोज ताजने गोंदिया
आपल्याकडील वाहन धूर फेकत आहे? वाहनात रॉकेलचा वापर करता म्हणून ते प्रदूषण पसरवीत आहे? एवढेच काय, पण आपल्याकडील वाहन भंगारमध्ये पडून आहे? नो प्रॉब्लम, आपले वाहन रस्त्यावरून चालताना अजिबात प्रदूषण पसरवित नाही, असे प्रमाणपत्र आपल्याला सहज मिळू शकते. वाहतूक अधिनियमानुसार प्रत्येक वाहनासाठी आवश्यक असणारे हे प्रमाणपत्र हवे असेल तर गोंदियात या, अवघे ५० रुपये द्या, आणि आपले वाहन प्रदूषणमुक्त करून जा.
विश्वास बसणार नाही, पण प्रदूषणमुक्तीचा हा खेळखंडोबा सध्या गोंदियात बिनदिक्कतपणे सुरू आहे. अवघ्या ५० रुपयात येथील खासगी ‘पीयूसी सेंटर’ वर आपल्याला हमखास हे प्रदूषणमुक्तीचे प्रमाणपत्र (स्टिकर) मिळते. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये हा प्रकार चव्हाट्यावर आला.
रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक वाहनाला दर सहा महिन्यातून एक वेळ वाहन प्रदुषणमुक्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (पीयुसी) घेणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाला हे पीयुसी स्टिकर नसेल तर वाहतूक नियंत्रक किंवा परिवहन अधिकारी आपल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करू शकतात. त्यामुळे पीयुसी स्टिकर देणारी काही खासगी दुकानेच गोंदियात थाटण्यात आली आहेत. परिवहन विभागाकडून त्यांना अधिकृत परवानगी असली तरी प्रत्यक्षात कोणत्याही वाहनाची प्रत्यक्ष तपासणी न करताच नियमबाह्यपद्धतीने केवळ कागदोपत्री प्रदुषणमुक्ती दाखविण्याचा हा प्रकार कितपत योग्य? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाचा या पीयूसी केंद्रांवर कोणताच अंकुश नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ‘लोकमत’ने शहरातील परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयासमोर असलेल्या आणि जयस्तंभ चौकात असलेल्या पीयूसी केंद्रावरून दोन वाहनांच्या पीयूसी स्लिप घेतल्या. मात्र कोणीही प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी वाहन दाखविण्याचा आग्रह केला नाही. अशाच पद्धतीने वाहनांना ‘प्रदुषणविरहित वाहन’ असे प्रमाणपत्र मिळत असेल तर पीयूसी तपासणीचा उद्देश किती सफल होणार?
जि.प.चे भंगार वाहनही प्रदूषणमुक्त
गोंदिया जिल्हा परिषदेच्या मागील बाजूूने अनेक भंगार वाहने एका रांगेत उभी आहेत. शहरातील जयस्तंभ चौकातील केंद्रात पीयूसी प्रमाणपत्र घेण्यासाठी गेल्यानंतर तेथे उपस्थित व्यक्तीला जिल्हा परिषदेच्या भंगार वाहनातील चेपलेल्या ‘एमएच ३५, डी २९५’ या टाटा सुमो जीपचा क्रमांक सांगून पीयूसी प्रमाणपत्र मागितले. त्याने कोणतीही चौकशी न करताना थेट वाहन प्रदूषणमुक्त असल्याचे स्टिकर बनवून दिले. त्याच्या हातात ५० रुपये ठेवून हे स्टिकर घेण्यात आले.