५० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By Admin | Updated: April 1, 2016 02:04 IST2016-04-01T02:04:36+5:302016-04-01T02:04:36+5:30

जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या मागास प्रवर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपैकी ....

50 percent of the students are deprived of scholarship | ५० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

५० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

अधिकाऱ्यांची उदासीनता : मंत्र्यांच्या जिल्ह्यातच फटका
गोंदिया : जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या मागास प्रवर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपैकी ५१ टक्के विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या उदासीनतेमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ४९ टक्केच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींची बिलं समाजकल्याण विभागाने टाकली आहेत. समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या या उदासीनतेचा फटका सामाजिक न्यायमंत्र्यांच्या जिल्ह्यालाच बसणे ही बाब आश्चर्याची ठरत आहे.
जिल्ह्याचे समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांच्याकडेच नागपूर जिल्ह्याचाही प्रभार आहे. त्यामुळे कधी इकडे तर कधी तिकडे असा कारभार पाहताना त्यांनाही मोठी कसरत करावी लागली. यात त्यांनी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गोंदिया जिल्ह्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्याकडे जास्त लक्ष दिले. त्यामुळे गोंदियात पूर्णवेळ समाजकल्याणचे सहायक आयुक्त असतानाही त्यांनी प्रभारी असलेल्या नागपूर जिल्ह्याला प्राधान्य दिल्याने त्याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बसणार आहे.
यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यातून ३५ हजार ६३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र होते. मात्र त्यापैकी १७ हजार ५७६ विद्यार्थ्यांचीच बिलं समाजकल्याण विभागाकडून पाठविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी कधी नव्हे ती सर्वाधिक शिष्यवृत्ती ओबीसी प्रवर्गासाठी आली होती. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्याचा वेळीच लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागले. आता पुन्हा ती रक्कम मिळविण्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. या विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याची मागणी होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 50 percent of the students are deprived of scholarship