४८ लाखांचा बोझा आमगाव पाणी पुरवठा योजनेवर?
By Admin | Updated: May 19, 2014 23:38 IST2014-05-19T23:38:16+5:302014-05-19T23:38:16+5:30
आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत लोकसंख्या प्रमाणात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे.

४८ लाखांचा बोझा आमगाव पाणी पुरवठा योजनेवर?
आमगाव : आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत लोकसंख्या प्रमाणात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. परंतु सदर योजना कर्जाच्या भार असलेल्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला समाविष्ट करण्याच्या निर्णयाविरुद्ध नागरिकांनी बंड पुकारले आहे. आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी शासनाकडून जलकुंभ व जलशुद्धीकरण संयंत्राची मागणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत नागरिकांना कुशलतेने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आमगाव येथील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाने दोन कोटीची वाढीव पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली. त्या योजनेचे कार्य युद्धपातळीवरध सुरू आहे. या योजनेमुळे आमगाव येथील नागरिकांना मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय होईल यात शंका नाही. परंतु नागरिकांना अंधारात ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाने सदर योजना कर्जाच्या भाराखाली दडपलेल्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला समाविष्ठ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्काचे पाणी पळविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतकडून होत आहे. ४८ गावांची बनगाव पाणी पुरवठा योजना १९९८ ला शासनाच्या ३६ कोटीचा निधी खर्चून बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना निर्माण करण्यात आली. योजनेच्या प्रारंभापासूनच या योजनेवरील खर्च पेलण्यासाठी प्रशासनाकडून खापर फोडण्यात आले. खर्च भागत नसल्याने अनेकदा सदर योजना बंद करण्यात आली. तर नागरिकांच्या दबावाखाली पुन्हा प्रारंभ करण्यात येत आहे. सदर योजनेत नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. यामुळे योजनेत समाविष्ठ गावांनी या योजनेतून बाद झाले आहेत. बनगाव प्रादेशिक योजनेवर खर्च अधिक असल्याने व मिळकत कमी असल्याने मदतीअभावी योजना अखेरची घटका मोजत आहे. या योजनेवरील ४८ लाख रुपये अद्यापही महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाला देण्यात आले नाही. तर विद्युत खर्च ही सतत वाढत आहे. या वाढत्या खर्चाचा बोजा आता आमगाव येथील स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेवर देण्याचा प्रयत्न घालण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. ज्या योजनेवर लाखांचा बोजा असून या योजनेत आमगाव ग्रामपंचायतची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना समाविष्ठ करण्याचे कारण गुलदस्त्यात असल्याचे दिसते. ग्रा.पं.ने नामंजूर करुन आमगाव येथील पाणी पुरवठा योजना स्वतंत्र ठेवण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)