पाच वर्षात ४७१३ गर्भपात

By Admin | Updated: March 7, 2016 01:28 IST2016-03-07T01:28:29+5:302016-03-07T01:28:29+5:30

मूल जन्माला येणे ही ईश्वराची देण आहे, असे म्हटले जाते. मात्र मुलगा हवा की मुलगी हे आपल्या हातात नसतानाही ...

4713 miscarriages in five years | पाच वर्षात ४७१३ गर्भपात

पाच वर्षात ४७१३ गर्भपात

नरेश रहिले गोंदिया
मूल जन्माला येणे ही ईश्वराची देण आहे, असे म्हटले जाते. मात्र मुलगा हवा की मुलगी हे आपल्या हातात नसतानाही आपल्या इच्छेनुसार हवे तेच अपत्य असावे या हव्यासापायी गर्भपात करण्याचे प्रमाण समाजात आहे. योग्य कारणाशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करता येणार नाही असे शासनाचे धोरण असतानाही, लपून भोंदूबाबा व बोगस डॉक्टरांकडे जाऊन गर्भपात केले जातात. गोंदिया जिल्ह्यात मागील पाच वर्षात शासकीय व परवानगी असलेल्या खासगी रूग्णालयात ४ हजार ७१३ महिलांचा गर्भपात करण्यात आला.
अज्ञानी समाजापेक्षा सुशिक्षित समाजात सर्वाधिक गर्भपात होत असल्याची बाब दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०११-२०१२ मध्ये शासकीय गर्भपात केंद्रात ६६, परवानाप्राप्त खासगी रूग्णालयांमध्ये १८९ असे एकूण २५५, सन २०१२-२०१३ शासकीय गर्भपात केंद्रात १८२, परवानाप्राप्त खासगी रूग्णालयांमध्ये ७४१ असे एकूण ९२३, सन २०१३-२०१४ शासकीय गर्भपात केंद्रात ३८०, परवानाप्राप्त खासगी रूग्णालयांमध्ये ९४५ असे एकूण १३२५, सन २०१४-२०१५ शासकीय गर्भपात केंद्रात ३५९, परवानाप्राप्त खासगी रूग्णालयांमध्ये ८२८ असे एकूण ११८७, सन २०१५-२०१६ च्या एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यात शासकीय गर्भपात केंद्रात १९१, परवानाप्राप्त खासगी रूग्णालयांमध्ये ८३२ असे एकूण १०२३ गर्भपात करण्यात आले.
गेल्या पाच वर्षाच्या काळात करण्यात आलेल्या ४ हजार ७१३ गर्भपातात शासकीय रूग्णालयात ११७८ तर खासगी रूग्णालयात ३ हजार ५३५ गर्भपात करण्यात आले. मातेला किंवा बाळाला अतित्रास असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गर्भपात केला जातो. गर्भवती महिलांचे १२ आठवड्याच्या आत गर्भपात होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या शासकीय आकडेवारीवरून जाणवते.
मातेला त्रास असेल किंवा बालक शारीरिकदृष्ट्या व्यंग असेल तर अशा स्थितीत गर्भपात करण्याचा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ देतात. परंतु १२ आठवडे ते २० आठवड्याच्या आत गर्भपात करायचा असेल तर दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या परवानीशिवाय गर्भपात करता येत नाही, असे शासनाने ठरवून दिले आहे. मात्र आजच्या घडीला १२ ते २० आठवड्यात गर्भपात होण्याचे प्रमाणही दिसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराला महिलांची गर्भ सांभाळू शकण्याची शक्ती कमी झाली की काय, असेही या आकडेवारीवरून दिसून येते. एकंदर शासनाचे गर्भपात करण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांना तिलांजली दिली जात आहे. यामागचे कारण फक्त मुलगा हवा हे असून मुलींना मात्र कुचकरले जात आहे.

जिल्ह्यातील ३० केंद्रात होतो गर्भपात
जिल्ह्यातील १२ शासकीय व १८ खासगी रूग्णालयात गर्भपात करण्याची परवाने शासनाने दिली आहे. शासकीय रूग्णालयात बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया, उपजिल्हा रूग्णालय तिरोडा, ग्रामीण रूग्णालय देवरी, ग्रामीण रूग्णालय चिचगड, ग्रामीण रूग्णालय अर्जुनी-मोरगाव, ग्रामीण रूग्णालय नवेगावबांध, ग्रामीण रूग्णालय सालेकसा, ग्रामीण रूग्णालय आमगाव, ग्रामीण रूग्णालय सडक-अर्जुनी, ग्रामीण रूग्णालय गोरेगाव, ग्रामीण रूग्णालय रजेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव तर खासगी रूग्णालयात वैष्णवी नर्सिंग होम गोंदिया, कोलते नर्सिंग होम गणेशनगर गोंदिया, गोंदिया केअर हॉस्पिटल सिव्हील लाईन गोंदिया, जयपुरीया नर्सिंग होम सिव्हील लाईन गोंदिया, रतनपारखी नर्सिंग होम द्वारकानगर गोंदिया, श्री नर्सिंग होम रेलटोली गोंदिया, गुप्ता नर्सिंग होम टीबीटोली गोंदिया, धारस्कर नर्सिंग होम रेलटोली गोंदिया, सेंट्रल हॉस्पीटल अ‍ॅण्ड क्रिटीकल केअर हॉस्पीटल गड्डाटोली गोंदिया, बजाज नर्सिंग होम गणेशनगर गोंदिया, बी.जे. हॉस्पिटल गणेशनगर गोंदिया, एक्सीडेंट हॉस्पिटल गणेशनगर गोंदिया, भुस्कुटे नर्सिंग होम आमगाव, आयुष क्रिटीकल केअर हॉस्पिटल रेलटोली गोंदिया, कार्लेकर नर्सिंग होम गोंदिया, कल्पतरू नर्सिंग होम गणेशनगर गोंदिया, केएमजे मेमोरीयल हॉस्पीटल शास्त्री वॉर्ड गोंदिया, अनन्या नर्सिंग होम सिव्हील लाईन गोंदिया यांचा समावेश आहे. या रूग्णालयांशिवाय गोंदिया जिल्ह्यात इतर कोणत्याही रूग्णालयात गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे.

१२ ते २० आठवड्यात
२६२ गर्भपात

मागील चार वर्षातील गोंदिया जिल्ह्यातील मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांमधील आकडेवारी पाहता सन २०१२-२०१३ या वर्षात ५२, सन २०१३-२०१४ या वर्षात ६५, सन २०१४-२०१५ या वर्षात ६९ तर सन २०१५-२०१६ च्या १० महिन्यातच ७६ महिलांचा १२ ते २० आठवड्याच्या आतील गर्भ पाडण्यात आला.
दोन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ८ गर्भपात
अत्यंत परिस्थिती वाईट असेल अशा परिस्थिती दोन स्त्री रोग तज्ज्ञांनी सल्ला दिल्यास १२ ते २० आठवड्यातील गर्भवतीचा गर्भपात करता येते. मागील तीन वर्षात अशीच अत्यंत वाईट परिस्थिती आल्यामुळे सन २०१३-२०१४ मध्ये ५, सन २०१४-२०१५ मध्ये २ तर सन २०१५-२०१६ च्या १० महिन्यात एक अशा आठ महिलांचा गर्भपात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली.

Web Title: 4713 miscarriages in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.