४५९ शिक्षक अतिरिक्त !

By Admin | Updated: December 4, 2015 01:55 IST2015-12-04T01:55:04+5:302015-12-04T01:55:04+5:30

जिल्हा परिषदेने एकीकडे जि.प. शाळांच्या तुकड्या तुटू नये यासाठी ‘गावची शाळा आमची शाळा’ उपक्रम अंमलात आणला.

45 9 teacher extra! | ४५९ शिक्षक अतिरिक्त !

४५९ शिक्षक अतिरिक्त !

बदलीग्रस्तांचा जीव टांगणीला : पटसंख्येच्या घोळात वाढतेय सहायक शिक्षकांची संख्या
नरेश रहिले गोंदिया
जिल्हा परिषदेने एकीकडे जि.प. शाळांच्या तुकड्या तुटू नये यासाठी ‘गावची शाळा आमची शाळा’ उपक्रम अंमलात आणला. मात्र या उपक्रमाने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्याऐवजी दरवर्षी कमी-कमी होत आहे. जि.प.शाळांच्या तुकड्या कमी होत असल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्याही वाढत आहेत. आरटीई कायद्यांतर्गत पटसंख्येवर भर दिल्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील ४५९ सहाय्यक शिक्षक अतिरिक्त
ठरले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही कल कॉन्व्हेंट संस्कृतीकडे वाढत आहे. त्यामुळे जि.प. शाळेतील शिक्षण सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘गावची शाळा आमची शाळा’ हा उपक्रम सुरू केला. त्यातून जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढ, गुणवत्ता वाढ याकडे लक्ष देण्यात आले. मात्र शासनाच्या आरटीई कायद्यान्वये जिल्ह्यातील अनेक तुकड्या तुटल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील ४५९ सहाय्यक शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात सहाय्यक शिक्षकांची २ हजार ९१३ पदे पटसंख्येनुसार मान्य आहेत. प्रत्यक्षात ३ हजार ३७२ सहाय्यक शिक्षक कार्यरत आहेत. यात ४५९ सहाय्यक शिक्षक अतिरिक्त आहेत. ६० विद्यार्थी पटसंख्येसाठी २ शिक्षक, ९० पटसंख्या असलेल्या शाळांवर तीन शिक्षक आहेत. पटसंख्या कमी झाल्यामुळे सहाय्यक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

बढती आणि सेवा ज्येष्ठतेचे गौंडबंगाल

पटसंख्येनुसार जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची ९३१ पदे मान्य आहेत. परंतु सध्या ४१८ पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. पदवीधर शिक्षकांची ५१२ पदे रिक्त आहेत. सहाय्यक शिक्षकांना सेवाजेष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक म्हणून बढती देण्यात येते. तसे केल्यास ९४ सहायक शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार त्यात बढती देऊन अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचा आकडा कमी होऊ शकतो. परंतू जिल्हा परिषदेकडे आजघडीला शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादीही तयार नाही.
४ २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सहाय्यक शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली नाही, असे जि.प.चे शिक्षण विस्तार अधिकारी पी.पी.तुरकर यांनी सांगितले. ७० विद्यार्थ्यांची पटसंख्या असली त्या ठिकाणी दोन पदवीधर शिक्षक देता येते व ७० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत ३ पदवीधर शिक्षक देता येतात. वर्ग ६ ते ८ या वर्गासाठी हे पदवीधर शिक्षक असतात.

५० शाळांत मुख्याध्यापकच नाही
आरटीई कायद्यानुसार वर्ग १ ते ७ वी पर्यंत वर्ग असलेल्या शाळांत १०० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापकाची गरज नाही. गोंदिया जिल्ह्यात अशा ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची ३२५ पदे मंजूर असून २७५ पदे भरण्यात आली आहेत. या ठिकाणी रिक्त असलेल्या ५० जागांवरही अद्याप कोणाला बढती देण्यात आलेली नाही.
आंतरजिल्हा बदलीत गेले ५०, आले २३६
सन २०१२ मध्ये आंतरजिल्हा बदलीतून गोंदिया जिल्ह्यातून ५० शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात परत गेले. मात्र बाहेरच्या जिल्ह्यात कार्यरत असलेले २३६ शिक्षक गोंदिया जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे १८६ शिक्षक जिल्ह्यात त्यावेळी अतिरिक्त झाले होते. पटसंख्या कायम राहिली असती किंवा गावची शाळा आमची शाळा प्रकल्पानंतर पटसंख्येत वाढ झाली असती तर शिक्षकांची आणखी पदे निर्माण झाली असती. शिवाय सेवानिवृत्ती किंवा आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर त्या अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करणे शक्य झाले असते. मात्र पटसंख्या कमी होत असल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वर्षांपासून ताटकळत असलेल्या शिक्षकांना बसला आहे.

Web Title: 45 9 teacher extra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.