४१ वर्षांनंतर पंतप्रधान गोंदियात
By Admin | Updated: October 4, 2014 23:28 IST2014-10-04T23:28:15+5:302014-10-04T23:28:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ५ आॅक्टोबर रोजी गोंदियात जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक इंदिरा गांधी स्टेडीयम येथे सायंकाळी ५.३५ वाजता मोदी यांचे भाषण होणार आहे.

४१ वर्षांनंतर पंतप्रधान गोंदियात
दोन हजारावर पोलीस : सहा जिल्ह्यातून आले १७०० अधिकारी-कर्मचारी
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ५ आॅक्टोबर रोजी गोंदियात जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक इंदिरा गांधी स्टेडीयम येथे सायंकाळी ५.३५ वाजता मोदी यांचे भाषण होणार आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून गोंदियात येत असलेले नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान आहेत. तब्बल ४१ वर्षानंतर गोंदिया पंतप्रधानांचे आगमन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
यापूर्वी ९ फेब्रुवारी १९७१ रोजी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार स्व. ज्वालाप्रसाद दुबे यांच्या प्रचारासाठी गोंदिया नगर परिषद मैदानावर पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. १९५१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी लोकसभेचे उमेदवार स्व.चतुर्भूज जसानी तर विधानसभेचे उमेदवार स्व. मनोहरभाई पटेल होते. १९७१ नंतर कोणीही पंतप्रधान गोंदियात आले नाही.
त्यामुळे गोंदियात येत असलेले मोदी हे तिसरे प्रधानमंत्री असल्याची माहिती स्वातंत्र्य संग्राम सेनानी व माजी मंत्री केवलचंद जैन यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात येत आहे.
गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण येथून १७०० कर्मचारी, अधिकारी मागविण्यात आले आहे. सोबतच सी-६० च्या सात पाटर्या, एक एसआरपी कंपनी, दिल्ली येथील पंतप्रधानांचे विशेष सुरक्षा पथक, नागपूर येथील विशेष सुरक्षा विभागाचे अधिकारी, एक पोलीस उपायुक्त, तीन अतिरीक्त पोलीस अधिक्षक, ८ उपविभागीय पोलीस अधिकारी, ९ पोलीस निरीक्षक, ५० सहायक पोलीस निरीक्षक व ८ महिला अधिकारी बंदोबस्तात राहणार आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात राहणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पंतप्रधानांसाठी हे मार्ग राहणार बंद
पंतप्रधान सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी स्टेडियम येथे येत असल्याने वाहतुक नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने अनेक रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यात बालाघाटकडून गोेंदियाकडे येणारी जड वाहने मुरपार चेकपोस्टपासून रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत उभी राहतील. तिरोडा ते गोंदियाकडे येणारी जड वाहने गंगाझरीपासून रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत उभे राहतील. आमगावकडून गोंदियाकडे येणारी जड वाहने खमारीपासून रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत उभे राहतील. गोरेगावकडून गोंदियाकडे येणारी जड वाहन पोलीस ठाणे गोरेगावपासून एका रांगेत उभे राहतील. कामठाकडून रावणवाडीकडे येणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात आली आहे. जयस्तंभ चौकातून बालाघाट, तिरोडाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. फक्त चारचाकी वाहनेमाटन मार्केट, भूमाीगत पूल, कुडवानाका मार्गे जातील. गर्ल्स महाविद्यालयाकडून आंबेडकर चाौकात येणारी संपुर्ण वाहतुक, न्यायालयाकडून आंबेडकर चौकाकडे येणारी सर्व वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. गोरेलाल चौकातून नेहरू चौकाकडे, श्री टॉकीज कडून जयभोले स्पेअर पार्टकडे, सिव्हील लाईनकडून नेहरू चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनकडून मनोहर म्युनिसिपल शाळेकडे, डाकघराकडून गंगाबाई रूग्णालयाकडे येणारी सर्व वाहतूक बंद राहील.