जिल्हाभरात पाण्याचे ४०८ स्त्रोत दूषित
By Admin | Updated: September 22, 2014 23:20 IST2014-09-22T23:20:15+5:302014-09-22T23:20:15+5:30
जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत किती दूषित आहेत याची चाचणी करणाऱ्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने आॅगस्ट महिन्यात जिल्ह्याभरातील ४ हजार ८३ ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले.

जिल्हाभरात पाण्याचे ४०८ स्त्रोत दूषित
प्रयोगशाळेचा अहवाल : १० टक्के पाणी पिण्यास अयोग्य
गोंदिया : जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत किती दूषित आहेत याची चाचणी करणाऱ्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने आॅगस्ट महिन्यात जिल्ह्याभरातील ४ हजार ८३ ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले. यात ४०८ पाण्याचे स्त्रोत दुषित, अर्थात पिण्यास अयोग्य असल्याचे लक्षात आले.
जिल्हाभर गेल्या दिड-दोन महिनाभरापासून सुरू असलेल्या आजारांच्या थैमानात या दुषित पाण्यानेही भर घातल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. विविध ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल १० टक्के पाणी पिण्यास अयोग्य असणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या ग्रामपंचायत किंवा संबंधित पाणी पुरवठा यंत्रणेकडून पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर किंवा क्लोरिनयुक्त द्रव टाकल्या जाते की नाही, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
आमगाव तालुक्यातील ५६० ठिकाणच्या पाण्याची चाचणी करण्यात आली. त्यात ११ नमुने दुषित आढळले. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २३२ पाणी नमुन्यांपैकी २० नमुने दुषित आढळले. देवरी तालुक्यातील ४०४ ठिकाणच्या नमुन्यांपैकी ४६ नमुने दुषित आढळले. गोंदिया तालुक्यातील १२४५ ठिकाणच्या पाण्याची चाचणी करण्यात आली. त्यात २४१ नमुने दुषित आढळले. गोरेगाव तालुक्यातील ४१४ ठिकाणच्या पाण्याची चाचणी करण्यात आली. त्यात १८ नमुने दुषित आढळले. सडक/अर्जुनी तालुक्यातील ३७६ ठिकाणच्या नमुन्यांपैकी २० नमुने दुषित आढळले. सालेकसा तालुक्यातील ३३४ ठिकाणच्या पाण्याची चाचणी करण्यात आली. त्यात ३५ नमुने दुषित आढळले. तसेच तिरोडा तालुक्यातील ६१८ ठिकाणच्या पाणी नमुन्यांपैकी १७ नमुने दुषित आढळले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ४०८३ पाण्याच्या स्त्रोताची चाचणी केल्यावर ४०८ ठिकाणचे पाणी दुषित आढळल्याची माहिती कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सुभाष उताने यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)