जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या अफरातफरीची ४०५ प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:50+5:302021-09-10T04:35:50+5:30

नरेश रहिले गोंदिया : जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायती आहेत; परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी गावचा विकास करण्यापेक्षा शासकीय निधी हडपण्याची ...

405 cases of fraud committed by Gram Panchayats in the district | जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या अफरातफरीची ४०५ प्रकरणे

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या अफरातफरीची ४०५ प्रकरणे

नरेश रहिले

गोंदिया : जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायती आहेत; परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी गावचा विकास करण्यापेक्षा शासकीय निधी हडपण्याची जणू शर्यतच लावली आहे. जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींनी शासकीय निधीची अफरातफर केल्याची ४०५ प्रकरणे जिल्हा परिषदेकडे आली आहेत. या प्रकरणांवरून ग्रामसेवक गावच्या विकासासाठी की, विकास निधी हडपण्यासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा, गोंदिया हे ८ तालुके आहेत. या आठही तालुक्यांत असलेल्या ग्रामपंचायतची संख्या आजघडीला ५४६ आहे. बांधकामात माेठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार, काम न करताच निधीची उचल, असे विविध प्रकरण गावकरीच चव्हाट्यावर आणतात. यासंदर्भात मागील २-३ वर्षांत जिल्हा परिषदेला ४०५ तक्रारी आल्या आहेत. काही तक्रारींवर सुनावणी सुरू असून, काही प्रलंबित आहेत.

ग्रामपंचायतमधील सर्व माहिती ऑनलाइन झाली, तर ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येईल. ऑनलाइन ग्रामपंचायत नसल्यामुळे ग्रामपंचायतीने कोणती कामे केली व कोणती कामे केली नाहीत, याची माहितीच नागरिकांना मिळत नाही. अनेक कामे न करताच बिलाची उचल केली जाते व ते बिंग ऑनलाइनमुळे फुटेल त्यासाठी ग्रामपंचायत ऑनलाइन केली जात नाही. काही ठिकाणी मोबाइल टॉवरच्या अभावामुळे ऑनलाइन करणे शक्य होत नाही; परंतु ही संख्या अत्यंत कमी आहे; परंतु बिंग फुटू नये या धास्तीपोटी ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाइन होत नाही.

...........

खासगी व्यक्तींकडूनही लूट

शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी गरिबांनाही लुटण्याचा प्रकार काही ग्रामसेवकांकडून केला जातो. शौचालयाच्या लाभाचे पैसे किंवा घरकुलाचा लाभ देण्यासाठी गोरगरिबांकडून पैशांची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकांच्या जाचाला कंटाळून नागरिकांनी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्वाधीन केले. शासकीय निधीची अफरातफर करूनही पैसे कमविण्याचा हव्यास कमी न झालेल्या अनेक ग्रामसेवकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

...........

ग्रामपंचायत ऑनलाइनपासून दूर

पारदर्शक कारभार जनतेसमोर यावा, यासाठी शासनाने सर्व ग्रामपंचायत ऑनलाइन करण्याचे निर्देश दिले. यात प्रत्येक ग्रामपंचायतीने केलेली कामे, जन्म-मृत्यूच्या नोंदी व सर्वच माहिती ऑनलाइन करण्याचे निर्देश आहेत; परंतु जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती ऑनलाइनपासून दूर आहेत. ग्रामपंचायतमार्फत केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असते. त्या कामांची माहिती सरळ जनतेला होईल. यामुळे धास्तावलेले ग्रामसेवक ग्रामपंचायती ऑनलाइन करीत नसल्याची माहिती आहे.

Web Title: 405 cases of fraud committed by Gram Panchayats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.