४० पाणी पुरवठा योजना बंद

By Admin | Updated: April 18, 2017 01:05 IST2017-04-18T01:05:49+5:302017-04-18T01:05:49+5:30

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उष्णतेमुळे पशुपक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त होत आहे. जंगलातील पशू-पक्ष्यांना पाणी मिळावे ही जबाबदारी वनविभाग सांभाळत आहे.

40 water supply schemes closed | ४० पाणी पुरवठा योजना बंद

४० पाणी पुरवठा योजना बंद

३६ योजनांची बत्ती गुल : चार योजनांना देखभाल दुरूस्तीचा फटका
नरेश रहिले गोंदिया
अंगाची लाही-लाही करणाऱ्या उष्णतेमुळे पशुपक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त होत आहे. जंगलातील पशू-पक्ष्यांना पाणी मिळावे ही जबाबदारी वनविभाग सांभाळत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यातील काही गावांत मनुष्यप्राणीच पाण्यासाठी तडफडत आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात पाणी असूनही केवळ वीज बिल भरले नसल्यामुळे ३६ पाणी पुरवठा योजना तर नादुरूस्तीमुळे चार योजना ऐन उन्हाळ्यात बंद आहेत. त्यामुळे ४० गावांतील नागरिकांचा घसा कोरडा पडला आहे.
जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या ४७२ योजना सुरूवातीपासून आतापर्यंत तयार करण्यात आल्या. त्यात २२४ योजना जुन्या तर २४८ योजना सन २०११-१२ पासून आतापर्यंतच्या आहेत. जुन्या २२४ पैकी ४ योजना देखभाल दुरूस्तीअभावी बंद पडून आहेत. ग्राम पंचायतच्या उदासीनतेमुळे सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरूस्ती होऊ शकली नाही. परिणामी या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सन २०११-१२ नंतर जिल्ह्यात २४८ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. त्यातील १८१ योजना सुरू आहेत. मात्र विद्युत पुरवठ्याअभावी ३६ बंद आहेत. ३१ योजनांचे काम अपूर्ण आहे. यात गोंदिया तालुक्यात ५५ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील ४१ योजना सुरू आहेत. विद्युत पुरवठ्याअभावी १३ बंद आहेत. एका योजनेचे काम अपूर्ण आहे. गोरेगाव तालुक्यात २८ योजना मंजूर करण्यात आल्या. त्यातील २३ योजना सुरू आहेत. विद्युतपुरवठ्याअभावी ४ बंद आहेत. एका योजनेचे काम अपूर्ण आहे.
तिरोडा तालुक्यात ४६ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील २७ योजना सुरू आहेत. विद्युत पुरवठ्याअभावी ८ बंद आहेत. तर ११ योजनांचे काम अपूर्ण आहे. आमगाव तालुक्यात २७ योजना मंजूर करण्यात आल्या. त्यातील १६ योजना सुरू आहेत. विद्युत पुरवठ्याअभावी ५ बंद आहेत, तर ६ योजनांचे काम अपूर्ण आहे. देवरी तालुक्यात २७ योजना मंजूर करण्यात आल्या. त्यातील २१ योजना सुरू आहेत. विद्युत पुरवठ्याअभावी २ बंद आहेत, तर ४ योजनांचे काम अपूर्ण आहे. सालेकसा तालुक्यातील १७ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील १३ योजना सुरू आहेत.
विद्युत पुरवठ्याअभावी ४ बंद आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात मंंजूर १७ योजनांपैकी १४ योजना सुरू आहेत. ३ योजनांचे काम अपूर्ण आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात ३१ मंजूर योजनांपैकी २६ योजना सुरू आहेत. ५ योजनांचे काम अपूर्ण आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने होत नाही. ग्राम पंचायतींच्या उदासीनतेमुळे कुठे वीज नाही तर कुठे देखभाल दुरूस्ती होत नसल्याने या योजना बंद आहेत.

बिल भरायला पैसेच नाही
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक योजना बंद पडल्या आहेत. वीज कंपनीचे बिल भरायला ग्रामपंचायतींकडे पैसेच नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेने त्यासाठी आर्थिक हातभार लावण्याची गरज आहे. अशा योजनांमध्ये गोंदिया तालुक्यातील पारडीबांध नळ पाणी पुरवठा योजना, तांडा नपापु योजना, चुलोद, कोरणी, डोंगरगाव, बनाथर, बिरसोला, गिरोला, धामनगाव, चारगाव, सिरपूर, मेंढा, गोरेगाव तालुक्यातील डव्वा, सिलेगाव, तेलनखेडी, बोटे, झांझिया, मोहगाव तिल्ली, घिवारी, तिरोडा तालुक्यातील मांडवी, भोंबोडी, केसलवाडा, बिहिरिया, अत्री, सिल्ली, आमगाव तालुक्यातील कोपीटोला, घाटटेमनी, कोसमटोला, महारीटोला, गिरोला, देवरी तालुक्यातील केशोरी, पलानगाव, सालेकसा तालुक्यातील पठाणटोला, जांभळी, जमाकुडो, गिरोला नपापु योजना आदींचा समावेश आहे.
३१ योजना अपूर्णावस्थेत
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा योजनेचे काम करवून घेतले जाते. परंतु किरकोळ कामांमुळे या ३१ योजना पूर्ण झाल्या नाहीच. अशा गोंदिया व गोरेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक, तिरोडा तालुक्यातील ११, आमगाव ६, देवरी ४, अर्जुनी-मोरगाव ३ व सडक-अर्जुनी ५ अश्या ३१ पाणी पुरवठा योजनांचे काम अपूर्ण आहे. या योजनांचे काम केव्हा पुर्णत्वास जाणार याची प्रतीक्षा संबंधित गावातील नागरिकांना आहे.

Web Title: 40 water supply schemes closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.