अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटलांची ४० पदे रिक्त
By Admin | Updated: January 1, 2017 01:50 IST2017-01-01T01:50:24+5:302017-01-01T01:50:24+5:30
गावात नियुक्त होणाऱ्या पोलीस पाटीलाचे पद गावपातळीवर लाभाच्या पदासह मानाचे पद समजल्या जाते.

अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटलांची ४० पदे रिक्त
बोंडगावदेवी : गावात नियुक्त होणाऱ्या पोलीस पाटीलाचे पद गावपातळीवर लाभाच्या पदासह मानाचे पद समजल्या जाते. गावकऱ्यांना वेळोवेळी लागणाऱ्या दाखल्यांसाठी पोलीस पाटलांकडे धाव घ्यावी लागते. गावात शांती, सुव्यवस्था नांदून अवैध धंद्यांवर वचक बसविण्यासाठी पोलीस पाटलांची महत्वपूर्ण भूमिका असते. मात्र असे असताना आजघडीला अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेल्या पोलीस पाटलांच्या एकूण पदांपैकी ४० पदे रिक्त आहेत.
महसूल विभागाच्या वतीने नियुक्त करण्यात येणारे पोलीस पाटील प्रत्यक्षात पोलीस विभागाच्या अखत्यारीत काम करीत असल्याचे दिसते. हे पोलीस पाटील गावात प्रतिष्ठित व सन्मानजनक असतात. गाव पातळीवरील इत्यंभूत माहिती पुरविणारे पोलीस दूत म्हणूनसुद्धा पोलीस पाटलांना ओळखले जाते. या तालुक्याला काही भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशिल गणला जात असताना प्रशासनाने पोलीस पाटलांची पदे रिक्त ठेवण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, केशोरी असे तीन पोलीस स्टेशन आहेत. अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनअंतर्गत एकूण ६० गावात पोलीस पाटलांच्या जागा आहेत. सध्या ४७ ठिकाणी पोलीस पाटील कार्यरत आहेत. आजही १३ गावांमध्ये पोलीस पाटील नाही. केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत २६ गावात पोलीस पाटील आहेत. १५ जागा आजही रिक्त आहेत. केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत १२ गावांमधील पोलीस पाटलांचे पद रिक्त आहेत. तालुक्यात तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये मिळून ४० जागा पोलीस पाटलांचे पद रिक्त आहेत.
गावात पोलीस पाटील नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आवश्यक दाखल्यासाठी मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. गावात शांती व सलोखा राहण्यासाठी पोलीस पाटील महत्वाची जबाबदारी पर पाडून गावातील अवैध धंद्याची माहिती पोलीस विभागास देतात. पोलीस पाटील गावातच नसल्याने अनेक समस्या वाढीस लागल्या आहेत.(वार्ताहर)