लग्नाच्या जेवणातून ४० लोकांना विषबाधा; गोंदियातील गोरेगाव तालुक्यात घडला प्रकार
By अंकुश गुंडावार | Updated: April 6, 2025 11:54 IST2025-04-06T11:53:52+5:302025-04-06T11:54:59+5:30
यामध्ये ८ बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

लग्नाच्या जेवणातून ४० लोकांना विषबाधा; गोंदियातील गोरेगाव तालुक्यात घडला प्रकार
लग्नाच्या जेवणातून ४० लोकांना विषबाधा झाल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील बबई येथे घडली आहे. गोरेगाव तालुक्यातील बबई येथील केशोवराव बिसेन यांच्याकडे ३ एप्रिल रोजी मुलाचा लग्न समारंभ होता. ४ एप्रिल रोजी परतीची वरात बबई येथे आल्यानंतर उपस्थित वराडी आणि गावकऱ्यांना दुपारी दोनच्या सुमारास जेवण दिले. या जेवणातून जवळपास ४० लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ८ बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.
विषबाधा झालेल्यांना गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरित २६ लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, ५ रुग्णांवर गोरेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात, ५ रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा येथे तर गोंदिया येथील खाजगी रुग्णालयातही काही रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.
गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा व ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे भेट देत रुग्णांची विचारपूस केली यावेळी माजी समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे बबई चे माजी सरपंच सोमेश रहांगडले, अभियंता रवी बघेले आदी उपस्थित होते.