१६०३ जागांसाठी ३८८८ नामांकन
By Admin | Updated: July 15, 2015 02:08 IST2015-07-15T02:08:34+5:302015-07-15T02:08:34+5:30
जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २५ जुलै रोजी होत आहे. त्यासाठी १६०३ प्रभागांसाठी दाखल नामांकनांपैकी एकूण ३८८८ नामांकन वैध ठरले आहेत.

१६०३ जागांसाठी ३८८८ नामांकन
ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज उद्यापासून उचलणार
गोंदिया : जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २५ जुलै रोजी होत आहे. त्यासाठी १६०३ प्रभागांसाठी दाखल नामांकनांपैकी एकूण ३८८८ नामांकन वैध ठरले आहेत. सर्वात जास्त नामांकन गोंदिया तालुक्यात आले आहेत.
आमगाव तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या ग्रापंचायतींची सदस्य संख्या १९१ असून त्यासाठी ४७५ नामांकन पात्र ठरले आहेत. सालेकसा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या ग्रापंचायतींची ८१ सदस्य संख्या असून त्यासाठी २०४ नामांकन पात्र ठरले आहेत. देवरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. तसेच तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आहेत. या ग्रापंचायतींची २६० सदस्य संख्या असून त्यासाठी ५१९ नामांकन पात्र ठरले आहेत, तर १० नामांकन अर्ज अपात्र ठरले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रापंचायतींची सदस्य संख्या १७० असून त्यासाठी ३९४ नामांकन पात्र ठरले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आहेत. या ग्रामपंचायतींची २५२ सदस्य संख्या असून त्यासाठी तीन हजार ८८८ नामांकन पात्र ठरले आहेत.
तिरोडा तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या नियमित तर एका ग्रामपंचायतची पोटनिवडणूक आहे. या ग्रापंचायतींची सदस्य संख्या १५६ असून त्यासाठी ३३९ नामांकन पात्र ठरले आहेत, तर १२ नामांकनपत्र अपात्र ठरले आहे. गोरेगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या ग्रापंचायतींची सदस्य संख्या २३४ असून त्यासाठी ६१६ नामांकन पात्र ठरले आहेत. २१ नामांकनपत्र अपात्र ठरले आहेत.
गोंदिया तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रित निवडणुका तर एका ग्रामपंचायतची पोटनिवडणूक आहे. या ग्रामपंचायतींची सदस्य संख्या २५९ असून त्यासाठी ७४२ नामांकन पात्र ठरले आहेत, नऊ नामांकन अपात्र ठरले आहेत. ग्रामपंचायतच्या एक हजार ६०३ जागांसाठी ३ हजार ८८८ लोक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपापल्या पक्षाचे वर्चस्व ग्रामपंचायतवर असावे यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतही काँग्रेस-भाजपाच
गोंदिया जिल्हा परिषदेत बुधवारी नवीन पदाधिकारी सत्तारूढ होणार आहेत. पंचायत समित्यांमध्ये तीन ठिकाणी काँग्रेस आणि भाजपाने हातमिळवणी केल्यानंतर जिल्हा परिषदेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, १७ भाजपला तर १६ काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे जनतेचा कौल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तारूढ होईल असे आतापर्यंतचे चित्र होते. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला सारून भाजपची साथ देण्याची व्युहरचना केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे विरोधात बसण्याची वेळ आली आहे. दरम्यान काँग्रेस आणि भाजपाचे सर्व सदस्य गेल्या दोन दिवसांपासून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.
काँग्रेसने भाजपची साथ देऊ नये यासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत खलबते सुरू होती. काँग्रेसचे निरीक्षक पांडे गोंदियात दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेलही गोंदियात आले. मात्र आम्हाला आधी अध्यक्षपदाची संधी द्या, असे धोरण काँग्रेसने घेत राष्ट्रवादीची कोंडी केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने तो प्रस्ताव धुडकावून लावल्याचे समजते.