३७६ जण ‘रेफर टू गंगाबाई’
By Admin | Updated: November 3, 2015 02:20 IST2015-11-03T02:20:18+5:302015-11-03T02:20:18+5:30
बलात्कारपिडीत तरूणींची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर व्हावी अन्यथा प्रकरणातील आरोपींना त्या आरोपातून

३७६ जण ‘रेफर टू गंगाबाई’
गोंदिया : बलात्कारपिडीत तरूणींची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर व्हावी अन्यथा प्रकरणातील आरोपींना त्या आरोपातून सुटण्याची संधी मिळते. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत बलात्कारपीडित तरूणी, महिलांची तपासणी न करता त्यांना ‘रेफर टू गंगाबाई’ केले जात आहे.
पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी स्त्री रोग तज्ज्ञाकडून व्हावी असा नियम नाही. महिला डॉक्टर उपलब्ध असल्यास त्या डॉक्टरला आधी प्राधान्य दिले जाते. परंतु महिला डॉक्टर नसले तरी कोणतेही एमबीबीएस डॉक्टर त्या पिडीतेची वैद्यकीय चाचणी करू शकतात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. परंतु याबाबतची माहिती डॉक्टरांना आहे की नाही, अशी शंका येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयातील एमबीबीएस डॉक्टर त्या पीडितांची वैद्यकीय तपासणी न करता महिला डॉक्टर किंवा स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याचे कारण दाखवून त्यांना सरळ गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रूग्णालयात रेफर करतात.
डॉ.रंजना पारधी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात ४६/२०१० मध्ये जनहित याचीका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर राज्य शासनाने १० मे २०१३ रोजी एक पत्र काढून कोणताही एमबीबीएस डॉक्टर कलम ३७६ च्या प्रकरणात पिडीतांची वैद्यकीय चाचणी करू शकतो असे नमूद करण्यात आले आहे. हा नियम महाराष्ट्रात सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने हा नियम देशभरात लागू केला. ७ आॅगस्ट २०१५ रोजी केंद्र शासनाने सर्व समावेशक परिपत्रक काढून सर्व आरोग्य यंत्रणांना दिले, तरी देखील जिल्ह्यातील बहुतांश एमबीबीएस डॉक्टर त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. एखादा पुरूष एमबीबीएस डॉक्टर त्या पिडीत महिलेची तपासणी करीत असेल त्यावेळी त्या ठिकाणी त्या पिडीतेची एखादी नातेवाईक महिला उपस्थित राहणे गरजेचे आहे. जर एखाद्या रूग्णालयात महिला डॉक्टर असतील तर त्यांची तपासणी त्यांनीच करावी. परंतु तसे होताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)
पोलीसही अनभिज्ञ
बलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी कोणत्याही एमबीबीएस डॉक्टरला करता येणार हे पत्रक आरोग्य यंत्रणांना मिळाले. परंतु त्या पत्रकाची माहिती पोलीस यंत्रणेला नसल्यामुळे रूग्णालयातील डॉक्टर त्यांना स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून त्यांची दिशाभूल करतात. पोलिसांना या पत्रकाची माहिती नसल्यामुळे हे सर्व चालत आहे.
४ पीडित महिलांची वेळेत तपासणी गरजेची असते. वैद्यकीय चाचणीत जेवढा उशीर होईल तेवढीच आरोपींना सुटण्याची संधी मिळते. एमबीबीएस डॉक्टर त्यांची वेळेत तपासणी करीत नसल्यामुळे त्यांची चाचणी करण्यास उशीर होते.
प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरने बलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. त्या प्रकरणात उशीर झाल्यास आरोपींना सुटण्याची संधी मिळते. या प्रकरणात वेळेला महत्व आहे.
-डॉ. संजीव दोडके
अधीक्षक बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया