जिल्ह्यात आढळले ३५ सारस
By Admin | Updated: June 20, 2016 01:31 IST2016-06-20T01:31:37+5:302016-06-20T01:31:37+5:30
गोंदिया निसर्ग मंडळ, नागझिरा फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन, वनविभाग तसेच वन्यजीव विभाग यांच्या सहकार्यातून ....

जिल्ह्यात आढळले ३५ सारस
भंडारात २ तर बालाघाटमध्ये ४५ : तीन दिवस चालली सारस गणना
गोंदिया : गोंदिया निसर्ग मंडळ, नागझिरा फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन, वनविभाग तसेच वन्यजीव विभाग यांच्या सहकार्यातून जिल्ह्यात तीन दिवस सारस गणनेचा कार्यक्रम घेण्यात आला. यात जिल्ह्यात ३५ सारस आढळले आहेत. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात दोन तर लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाटमध्ये ४५ सारस टिपण्यात आले आहेत.
निसर्गाच्या कुशीत वसलेला जलसंपन्न असलेला तलावांचा आणि धानाचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्ह्यात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळे असून जिल्ह्यात असलेल्या माजी मालगुजारी तलावावर विविध प्रजातींचे स्थलांतर करु न विदेशी पक्षी जिल्ह्यात दाखल होतात. सारस हा पक्षी म्हणजे जिल्ह्याचे वैभव असून राज्यात केवळ गोंदिया जिल्हयातच सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. सारस हा स्थानिक पक्षी असून मोठा, उंच व रुबाबदार असलेला सारस ऐश्वर्य संपन्न आहे. या पक्षाला बघण्यासाठी अनेक पर्यटकांची पाऊले आता जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या काठाकडे वळली आहेत. विशेषत: परसवाडा, झिलमिली, नवेगावबांध, झालिया, बाघनदीचा किनारा यासह अन्य तलावांच्या काठावर सारस पक्षी आढळून येतात.
सारसांची नेमकी संख्या जिल्ह्यात किती असेल या दृष्टीने नुकतीच तीन दिवस सारस पक्ष्यांची गणना करण्यात आली.
मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार तसेच सारस संरक्षण प्रकल्प प्रभारी विश्वदयाल गौतम यांच्या मार्गदर्शनात ही सारस गणना पारंपरिक तसेच शास्त्रीय पध्दतीने करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
५० निसर्ग मित्रांनी घेतला सहभाग
तीन दिवस चाललेल्या या सारस गणनेत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील एकूण ५० ठिकाणी १७ चमूतील जवळपास ५० ते ५५ निसर्गमित्रांनी सारस गणना केली. या गणनेत मुनेश गौतम, सावन बहेकार, अविजीत परिहार, दुष्यंत रेभे, राहुल हारोडे, सुनील धोटे, भरत जसानी, अभय कोचर, शशांक लाडेकर, बबलू चुटे, सलिम शेख, प्रवीण मेंढे, जयू खरकाटे, जयपाल ठाकूर, रितेश अग्रवाल, राहूल भावे, प्रशांत मेंढे, दानवीर मस्के आदी ५० जणांनी सहभाग घेतला.