बारावीचे ३५ तर दहावीचे २८ कॉपीबहाद्दर पकडले
By Admin | Updated: March 23, 2017 00:56 IST2017-03-23T00:56:58+5:302017-03-23T00:56:58+5:30
यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी काही केंद्रांवर याला गालबोट लागले.

बारावीचे ३५ तर दहावीचे २८ कॉपीबहाद्दर पकडले
कॉपीमुक्तीला गालबोट : ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर सूट
गोंदिया : यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी काही केंद्रांवर याला गालबोट लागले. गोंदिया जिल्ह्यात कॉपी करताना बारावीच्या ३५ तर दहावीच्या २८ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली.
बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू झाली. बारावीची परीक्षा संपली असून दहावीचा केवळ एक पेपर शिल्लक आहे. यंदा एकाही केंद्रावर गैरप्रकार सुरू राहू नये यासाठी यंत्रणा सज्ज होती. भरारी पथकांनी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
परीक्षा अधिनियमानुसार परीक्षेतील गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी केंद्र संचालक व अतिरीक्त केंद संचालक यांना सूचना देऊन एका केंद्रावर सात व वर्गखोलीत तीन वेळा कॉपी (आक्षेपार्ह) साहित्य आढळल्यास मास कॉपी सुरू असल्याचे गृहीत धरून कारवाई केली जाणार होती. परीक्षार्थ्यांनी वह्या, पिशवी किंवा मोबाईल आणू नये असे आवाहन करण्यात आले होते.
ज्या वर्गात कॉपी चालत असेल त्यासाठी त्या वर्गातील पर्यवेक्षकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प शिक्षण विभागाने घेतला होता.
बारावीच्या २३ हजार २१३ विद्यार्थ्यानी ६९ केंद्रांवरून परीक्षा दिली. दहावीचे २३ हजार ३६ विद्यार्थी ९८ केंद्रांवरून परीक्षा देत आहेत. या परीक्षेत कॉपी करताना बारावीचे ३५ तर दहावीचे १९ विद्यार्थी पकडण्यात आले. गोंदिया शहरातून बारावीचे २ तर दहावीचे ९ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. गोंदिया ग्रामीण परिसरात बारावीचे १० कॉपी बहाद्दर पकडले. तिरोडा तालुक्यात बारावीचे १९ जण पकडले. आमगाव तालुक्यात दहावीचे ७ कॉपीबहाद्दर, सालेकसा तालुक्यात बारावीचे २ तर दहावीचा एक विद्यार्थी पकडला.
देवरी तालुक्यात दहावीचा एक, सडक-अर्जुनी तालुक्यात बारावीचा १ आणि दहावीचे ७ कॉपीबहाद्दर पकडले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बारावीचे १ तर दहावीचे ३ कॉपीबहाद्दर पकडले. (तालुका प्रतिनिधी)
उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने ११ जणांना पकडले
दहावी व बारावीचे मिळून ६३ कॉपी बहाद्दरांना जिल्ह्यातील पथकाने पकडले आहे. मात्र यापैकी सर्वाधिक कॉपीबहाद्दर उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) लोकेश मोहबंशी, विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे यांच्या पथकाने पकडले. यात कामठा केंद्रावरून दोन, जि.प.हायस्कूल सडक अर्जुनी येथे एक, जि.प.हायस्कूल नवेगावबांध एक व आमगाव तालुक्याच्या जगत हायस्कूल घाटटेमणी या केंद्रावरून सात कॉपीबहाद्दरांना दहावीच्या इतिहासच्या पेपरला बुधवारी पकडण्यात आले.
सात भरारी पथके
दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली होती. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार एक पथक असे सात पथक तयार करण्यात आले होते.
गोरेगाव तालुका निरंक
दहावी व बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. यात फक्त गारेगाव तालुका सुटला आहे. गोरेगाव तालुका खरच कॉपीमुक्त झाला की हेतूपुरस्सर या तालुक्याकडे भरारी पथकांनी दुर्लक्ष केले हे सांगता येत नाही. यंदा दहावी असो कि बारावी या दोन्ही वर्षातील गोरेगाव तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला कॉपी करताना पथक पकडू शकले नाही.