३४३ उमेदवार उरले रिंगणात
By Admin | Updated: October 21, 2015 01:57 IST2015-10-21T01:57:46+5:302015-10-21T01:57:46+5:30
येत्या १ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१९) नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम...

३४३ उमेदवार उरले रिंगणात
गोंदिया : येत्या १ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१९) नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनी ५९ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगर पंचायतींच्या ६८ जागांसाठी होत असलेल्या प्रथम निवडणुकीत आता ३४३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर या उमेदवारांना मंगळवारी (दि.२०) निवडणूक चिन्हांचे वाटपही करण्यात आले.
जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव, देवरी, गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या पाच तालुकास्थळांच्या ग्राम पंचायतींचा दर्जा वाढवून त्यांना नगर पंचायतींचा दर्जा देण्यात आला आहे. नव्याने स्थापना करण्यात आलेल्या या नगर पंचायतींमधील सालेकसा व आमगाव नगर पंचायतींच्या निवडणुकांवर स्थगिती आल्याने फक्त उर्वरीत चार नगर पंचायतींच्या निवडणुका होत असून येत्या १ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रीया घेतली जाणार आहे.
या नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सोमवारी (दि.१९) नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी ५९ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले असून आता ६८ जागांसाठी ३४३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यात गोरेगाव नगर पंचायतमध्ये आलेल्या ९९ नामांकन अर्जांमधील २३ नामांकन अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे येथे आता ७६ उमेदवार रिंगणात उरले आहेत. सडक-अर्जुनी नगर पंचायतमध्ये १९ उमेदवनारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले असल्याने येथे आता १०४ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतमध्ये ९० नामांकन अर्जांमधील आठ अर्ज मागे घेण्यात आले असून येथे आता ८२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर देवरी नगर पंचायतमध्ये १९ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने येथे आता १०४ उमेदवार रिंगणात उरले असून आपले भाग्य आजमावित आहेत.
विशेष म्हणजे मंगळवारी (दि.२०) रिंगणात उरलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याने निवडणुकीला रंग चढला आहे. (शहर प्रतिनिधी)