शहरात घरे ३४ हजार, अधिकृत नळ कनेक्शनधारक केवळ १४ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:02+5:302021-02-08T04:26:02+5:30
गोंदिया : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी ...

शहरात घरे ३४ हजार, अधिकृत नळ कनेक्शनधारक केवळ १४ हजार
गोंदिया : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या दीड लाखावर असून ३४ हजार घरे आहे. मात्र शहरात अधिकृत नळ कनेक्शनधारक केवळ १४ हजार असल्याची बाब पुढे आली आहे. नळकनेक्शनधारकाच्या संख्येत मागील दोन तीन वर्षांत वाढ झाली असली तरी शहरातील एकूण घरांच्या तुलनेत फार कमीच आहे. गोंदिया शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. सध्या याच योजनेंतर्गत शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी याप्रमाणे पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरात १४ हजार नळ कनेक्शनधारक अधिकृत असले तरी अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे. तर ग्राहकांकडील पाणी कराची रक्कम वसूल करणे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागासमोरील सदैव आव्हानच राहिले आहे. थकबाकीच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्याने या विभागाच्या अडचणीतसुद्धा वाढ होत आहे. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी या विभागांतर्गत अनेकदा मोहीम राबविली जाते. ग्राहकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी अनेकदा जनजागृती मोहीमसुद्धा राबविली जाते. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच थकीत पाणी कराचा आकडा १३ कोटी रुपयांवर गेला आहे.
..........
१३ कोटी रुपयांचा पाणी कर थकला
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत शहरात एकूण १४ हजार नळ कनेक्शनधारक आहेत. मात्र यापैकी काही ग्राहकांकडे मागील आठ ते दहा वर्षांपासून पाणी कराची रक्कम थकीत आहे. त्यामुळे थकीत पाणी कराचा आकडा आता १३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यात काही शासकीय कार्यालये, बड्या व्यक्तींकडेसुद्धा पाणीकर थकला आहे. पाणी कर वसुलीसाठी मोहीम राबवूनदेखील ग्राहक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.
......
दोन हजारावर अनधिकृत नळ कनेक्शनधारक
शहरातील काही भागात काही जणांनी स्वत:च अनधिकृत जोडणी करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी चोरत असल्याची बाब यापूर्वीसुद्धा उघडकीस आली होती. याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात जवळपास २ हजारावर अनधिकृत नळ कनेक्शनधारक असल्याचे बोलले जाते. त्यांचा शोध या विभागाकडून सुरू असल्याची माहिती आहे.
......
नवीन योजनेमुळे पाणी गळतीची समस्या मार्गी
गोंदिया शहराला पूर्वी जुन्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जात होता. मात्र ही योजना कालबाह्य झाल्याने नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आता पाणी गळतीची समस्यासुद्धा पूर्णपणे मार्गी लागली आहे.
......
कोट
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शहरात १४ हजार अधिकृत नळ कनेक्शनधारक आहेत. त्यांना नियमित दोन पाळीत पाणी पुरवठा केला जातो. मात्र ग्राहकांनीसुद्धा वापरलेल्या पाण्याचा कर भरणे आपले कर्तव्य आहे असे समजून पाणी कर भरण्याची गरज आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा कमी करण्यास मदत होईल.
- रत्नाकर चंद्रिकापुरे, कार्यकारी अभियंता मजीप्रा.
.......
शहराची एकूण लोकसंख्या
१ लाख ५४ हजार ३३२
........
शहरातील एकूण घरांची संख्या
३४ हजार ३४०
......
शहरातील एकूण नळ कनेक्शनधारक
१४ हजार
.........