३३७८ अर्ज वेटिंगवर
By Admin | Updated: December 13, 2015 01:53 IST2015-12-13T01:53:35+5:302015-12-13T01:53:35+5:30
कृषिपंपासाठी आलेले ३३७८ अर्ज अद्याप वेटिंगवरच आहेत. येत्या जूनपर्यंत या सर्व कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीची यंत्रणा कामाला लागली आहे.

३३७८ अर्ज वेटिंगवर
जूनपर्यंत मुदतवाढ : कृषिपंपाचे २६८८ नवीन प्रस्ताव दाखल
गोंदिया : कृषिपंपासाठी आलेले ३३७८ अर्ज अद्याप वेटिंगवरच आहेत. येत्या जूनपर्यंत या सर्व कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीची यंत्रणा कामाला लागली आहे. यामध्ये मार्च २०१५ पर्यंत प्रलंबित असलेले ६९० अर्ज असून उर्वरित २६८८ अर्ज चालू आर्थिक वर्षात दाखल झालेले आहेत.
शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने शेतीवर विपरीत परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती वाचविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. मात्र सिंचनासाठी पाणी घेणे म्हणजे कृषिपंपांची गरज पडते. पण त्यासाठी वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे.
आपल्या कृषिपंपांना अधिकृृत वीज मिळावी यासाठी शेतकरी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीकडे मार्च २०१५ पर्यंत असे २८२० अर्ज प्रलंबीत होते. यातील २१३० अर्जांना वीज वितरण कंपनीकडून ३० नोव्हेंबरपर्यंत वीज जोडणी देण्यात आली. तर उर्वरीत ६९० व आॅगस्ट २०१५ पर्यंत आलेले असे एकूण ३३७८ अर्ज सध्या वीज वितरण कंपनीकडे प्रलंबीत आहेत. कंपनीकडे अर्ज केल्यानंतर त्यांची डिमांड सुद्धा शेतकऱ्यांनी भरलेली आहे. मात्र त्यांना कनेक्शन देण्यात आलेले नसल्याने पैसे भरूनही वाट बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
विशेष म्हणजे वेटिंगवर असलेल्या या अर्जांना लवकरात लवकर वीज जोडणी मिळावी. तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना त्यांचे हक्काचे वीज कनेक्शन मिळावे यासाठी वीज वितरण कंपनीकडून आता कामाला गती दिली जात आहे. कंपनीने या प्रलंबित अर्जांना वीज जोडणी देण्यासाठी येत्या सहा महिन्यांचे टार्गेट घेतले आहे. जून महिन्यापर्यंत हे सर्व ३३७८ कृषीपंपांचे अर्ज निकाली काढून त्यांना वीज जोडणी दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील मार्च २०१५ मध्ये उरलेल्या ६९० अर्जांना मार्च २०१६ पर्यंत क्लियर करण्याचे टार्गेट कंपनीने ठरविले आहे. तर नव्याने आलेल्या २६८८ अर्जांना जूनपर्यंत वीज जोडणी देण्याचे ठरविण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
अर्जदार शेतकऱ्यांना पाठविले पत्र
डिमांड भरूनही वीज जोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा कधी कनेक्शन येणार याकडे लागल्या आहेत. अशात लवकर कनेक्शन मिळावे यासाठी ते मध्यस्थाला पकडून काम करवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना समोरच्या व्यक्तीला ‘खर्च-पाणी’ द्यावा लागतो. हे प्रकार घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीने सर्व अर्जधारक शेतकऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात अर्जदारांना ठरविलेल्या कालावधीत कनेक्शन दिले जाणार असल्याने त्यांनी मध्यस्थांपासून दूर राहावे तसेच कनेक्शनसाठी लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या साहित्याची खरेदी व वाहतूक करू नये असे सूचविले आहे.
उर्जामंत्र्यांच्या आदेशाला खो
सप्टेंबर महिन्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोंदियात आले असताना त्यांनी जुन्या प्रलंबित प्रस्तावांना डिसेंबरपर्यंत कनेक्शन देण्याची तर नवीन प्रस्तावांना मार्च २०१६ पर्यंत निकाली काढण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात ऊर्जामंत्र्यांच्या त्या घोषणेला खो देत हा कालावधी जूनपर्यंत वाढविण्यात आला.