तलाठ्यांच्या सहा पदांसाठी ३१४८ अर्ज
By Admin | Updated: September 9, 2016 01:59 IST2016-09-09T01:59:31+5:302016-09-09T01:59:31+5:30
जिल्ह्यात तलाठ्यांच्या अवघ्या ६ जागांसाठी तब्बल ३१४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

तलाठ्यांच्या सहा पदांसाठी ३१४८ अर्ज
गोंदिया : जिल्ह्यात तलाठ्यांच्या अवघ्या ६ जागांसाठी तब्बल ३१४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वसाधारण प्रवर्गातील ४४८ तर राखीव प्रवर्गांमधील २७०० अर्ज आहेत. येत्या ११ सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे.
विशेष म्हणजे यावेळी प्रथमच मुलाखती न घेता परीक्षेच्या निकालावरून थेट नियुक्तीचे आदेश मिळणार असल्यामुळे बेरोजगार उमेदवारांमध्ये अधिक उत्सुकता दिसून येत आहे. वर्ग ३ व ४ च्या कोणत्याही स्थायी पदांच्या भरतींसाठी मुलाखतींमध्ये कोणतीही गडबड होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आता मुलाखती बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेत कमावलेल्या गुणांवरच त्यांच्या नोकरीचे भवितव्य असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शन ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण काळजी घेतल्याचे दिसून येते.
तलाठ्यांची सहा पदे भरायची आहेत. त्यासाठी परीक्षेतील गुणांच्या आधारे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पहिल्या १२ किंवा १८ उमेदवारांना बोलविले जाऊ शकते. त्यात ज्या उमेदवारांचे कागदपत्र अपात्र ठरतील त्यांना संधी गमवावी लागेल आणि पुढील उमेदवाराला संधी मिळेल.
ईटीएच लि.पुणे या एजन्सीला परीक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. यात सदर पदांसाठी अर्ज मागविणारी जाहीरात प्रकाशित करणे, आॅनलाईन अर्ज स्वीकारणे, त्यांची स्क्रुटीनी करणे, अर्जदारांना हॉल तिकीट देणे आणि निकाल प्रकाशित करणे ही जबाबदारी ‘महाआॅनलाईन’कडे होती. तर परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांभाळली. ईटीएच या कंपनीकडे उत्तरपत्रिका पुरविणे, त्यांची तपासणी करणे, गुणांची यादी तयार करणे, उत्तरपत्रिकांची स्कॅनिंग करून पीडीएफ करणे अशा जबाबदाऱ्या आहेत. ज्या १२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे त्या केंद्रांवर कलम १४४ लागू राहील. (जिल्हा प्रतिनिधी)
पारदर्शकता राहणार
सदर परीक्षेची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील याची दक्षता आम्ही घेतली आहे. परीक्षेनंतर उमेदवारांचे पेपर कोषागार विभागाच्या कस्टडीत राहणार असल्यामुळे कोणतीही गडबड होण्यास वाव नाही. शिवाय सर्व पेपरचे स्कॅनिंगही होणार आहे.
- प्रवीण महिरे
निवासी उपजिल्हाधिकारी, गोंदिया