रिसामा येथील ३०९ कुटुंबांना मिळणार आखीव पत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:30+5:302021-03-18T04:28:30+5:30
आमगाव : आखीव पत्रिकेवर नाव नसल्यामुळे मालकी हक्कापासून वंचित असलेल्या ग्राम रिसामा येथील ३०९ कुटुंबांना आता दिलासा मिळणार ...

रिसामा येथील ३०९ कुटुंबांना मिळणार आखीव पत्रिका
आमगाव : आखीव पत्रिकेवर नाव नसल्यामुळे मालकी हक्कापासून वंचित असलेल्या ग्राम रिसामा येथील ३०९ कुटुंबांना आता दिलासा मिळणार आहे. आ. सहषराम कोरोटे यांच्या मध्यस्थीने अपर जमाबंदी आयुक्तांनी या मिळकती समाविष्ट करण्याचा आदेश दिला आहे. अशात आता या ३०९ कुटुंबांना आखीव पत्रिका मिळणार आहेत.
आमगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात जुन्याच सिटी सर्व्हेनुसार तालुक्यातील मिळकती (आखीव पत्रिका) कायम होत्या. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील कित्येक प्लॉटधारकांचे नाव आखीव पत्रिकेवर नव्हते. तालुक्यातील मौजा रिसामा येथील कित्येक घरमालकांचे आखीव पत्रिकेवर नाव नसल्याने बांधकाम नकाशा मंजूर करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. स्वतःच्या मालकीचे घर असूनही त्यांची घरावर मालकी नाही. घर विकणेही शक्य नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून न्याय मिळावा, यासाठी या भागातील नागरिकांचा लढा सुरू होता. १९९४ च्या शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करण्यात आली. त्या अनुषंगाने नागपूर विभागातील आमगाव तालुक्यातील मौजा रिसामा गावच्या सुटलेल्या ३०९ मिळकती प्रस्तावित होत्या. ही बाब रिसामा येथील से.नि.शिक्षक श्यामराव बहेकार, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संजय बहेकार, महिला तालुकाध्यक्ष छबू उके, बाजार समिती उपसभापती रविदत्त अग्रवाल, तालुका सचिव महेश उके, शहर अध्यक्ष अजय खेतान, सरपंच राजकुमार मोदी, रामेश्वर श्यामकुवर, उज्ज्वल ठाकूर यांनी आ. सहेषराम कोरोटे यांच्या लक्षात आणून दिली. प्रकरणी आमदार कोरोटे यांनी अपर जमाबंदी आयुक्त (पुणे) यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अपर जमाबंदी आयुक्तांच्या १५ मार्च २०२१ च्या आदेशानुसार ३०९ मिळकत समाविष्ट करणेबाबत मंजुरी मिळाली. आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नांनी ३०९ मिळकती कायम करण्यात आल्या असून, लवकरच ३०९ कुटुंबीयांना आखीव पत्रिका वाटप करण्यात येणार आहे.