३० प्रतिष्ठानांना नोटीस जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 01:11 IST2017-04-10T01:11:22+5:302017-04-10T01:11:22+5:30
सात जणांचा जीव घेणाऱ्या व जिल्ह्यासाठी कलंक ठरलेल्या बिंदल कॉम्प्लेक्सचे अग्निकांड आजही अंगावर शहारे उभे करते.

३० प्रतिष्ठानांना नोटीस जारी
फायर आॅडिट होणार : बिंदल अग्निकांडातून आली समज
गोंदिया : सात जणांचा जीव घेणाऱ्या व जिल्ह्यासाठी कलंक ठरलेल्या बिंदल कॉम्प्लेक्सचे अग्निकांड आजही अंगावर शहारे उभे करते. या घटनेतून शहरात असलेल्या प्रतिष्ठानांतील सुरक्षा व्यवस्था उघड्यावर पडली असून आज हीच घटना प्रतिष्ठान मालक व अग्निशमन विभागासाठी समज देणारी ठरत आहे. यातूनच अग्निशमन विभागाने शहरातील सुमारे ३० प्रतिष्ठानांना फायर आॅडिटसाठीचे नोटीस बजावल्याची माहिती आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात येथील अग्निशमन विभागाची जबाबदारी वाढत चालली आहे. शहराचे वाढते क्षेत्रफळ, मालमत्ता व लोकसंख्या हे एक चॅलेंज अग्निशमन विभागासाठी ठरत आहे. यातच बिंदल कॉम्प्लेक्समधील अग्निकांडाने याची वास्तवीकता सर्वांच्या पुढे आणून ठेवली. या अग्निकांडाच्या माध्यमातून बिंदलसह शहरात असलेली कित्येक प्रतिष्ठाने आजही सुरक्षीत नसल्याचे उघडकीस आले आहे. असे असतानाही मात्र नगर परिषद प्रशासन कसे हे चित्र बघत बसले आहे याचे आश्चर्य सर्वच व्यक्त करीत आहेत.
बिंदलच्या घटनेनंतर नागरिक व वृत्तपत्रांच्या जागरूकतेने पालिका व जिल्हा प्रशासन कारवाई भाग पडले खरे मात्र आजही पाहिजे त्या प्रमाणात नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे तेवढेच खरे आहे. मात्र या घटनेने काही प्रमाणात पालिका व अग्निशमन विभागाला समज दिली आणि यातूनच अग्निशमन विभागाने शहरातील सुमारे ३० प्रतिष्ठानांना फायर आॅडीटसाठी नोटीस धाडल्याची माहिती आहे. यातील सुमारे १५ प्रतिष्ठानांचे आॅडीट झाले असून उर्वरीतांचेही लवकरच आॅडीट केले जाणार आहे.
अग्निशमन विभागाने पूर्ण जबाबदारीने फायर आॅडीटचे हे काम पूर्ण केल्यास भविष्यात शहरात बिंदल कॉम्प्लेक्स सारख्या घटनांची पूनरावृत्ती टाळता येईल, यात शंका नाही. त्यामुळे आता अग्निशमन विभागाने नियमांना बगल न देता व कुणाचीही गय न करता काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी हीच अपेक्षा शहरवासी व्यक्त करीत आहेत.अग्नीशमन विभागाने बिंदलच्या घटनेनंतर लगेच फायर आॅडीटचे पत्र सर्वच प्रतिष्ठानांना देण्याचे म्हटले होते. परंतुअद्याप सर्वांना पत्र दिले नाही. (शहर प्रतिनिधी)
अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण
अग्निशमन विभाग एक जबाबदार विभाग असून हा विभाग पूर्णपणे सज्ज असणे गरजेचे आहे. मात्र येथील अग्निशमन विभाग आजही पांगळाच दिसून येत आहे. यात सर्वात गंभीर बाब म्हणजे विभागाला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण. विभागात आजघडीला ३४ कर्मचारी कार्यरत असून त्यात १३ कर्मचारी रोजंदारीवर काम करीत आहेत. सुमारे ५० कर्मचाऱ्यांची गरज विभागाला असल्याचे कळते. यात विशेष म्हणजे विभागाच्या प्रमुखाचीच खुर्ची मागील कित्येक वर्षापासून रिक्त पडून आहे. प्रभारी तत्वावर हे विभाग प्रमुख कार्यरत असून स्टेशन आॅफीसर, सब आॅफीसर, चालक अशी महत्वाची पदे रिक्त पडून आहेत. त्यात येणाऱ्या काळात सेवानिवृत्तीमुळे आणखीही पदे रिक्त होणार आहेत.
काही दिवसांत येणार दोन गाड्या
आजघडीला अग्निशमन विभागाकडे पाच गाड्या आहेत. यातील एक गाडी जुनी असून तिला दुरूस्तीची गरज आहे. त्याबाबतची मंजूर मिळाली असून लवकरच या गाडीची पूर्णपणे दुरूस्ती केली जाणार आहे. शिवाय आणखी दोन नव्या गाड्या येत्या काही दिवसांत येथील अग्निशमन विभागात दाखल होणार असल्याची माहिती प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रकाश कापसे यांनी दिली. या गाड्या आल्यास विभाग अधिक मजबूत होणार आहे.