नगर पंचायतींमध्ये २७ ला पदावरोहण
By Admin | Updated: November 19, 2015 02:14 IST2015-11-19T02:14:54+5:302015-11-19T02:14:54+5:30
मतदानाचा निकाल लागून १५ दिवस उलटून गेल्यानंतरही सत्तेच्या खुर्चीपासून दूर असलेल्या पदाधिकाऱ्यांना पदारूढ होण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ‘

नगर पंचायतींमध्ये २७ ला पदावरोहण
अध्यक्ष-उपाध्यक्ष ठरणार : विशेष सभेचे आयोजन
गोंदिया : मतदानाचा निकाल लागून १५ दिवस उलटून गेल्यानंतरही सत्तेच्या खुर्चीपासून दूर असलेल्या पदाधिकाऱ्यांना पदारूढ होण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ‘लोकमत’ने वर्तविलेल्या भाकितानुसार येत्या २७ नोव्हेंबरला नगर पंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार असून त्यासाठी चारही नगर पंचायतींमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी आणि गोरेगाव या चार नगर पंचायतींच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडून आलेल्या प्रत्येकी १७ सदस्यांची विशेष सभा दि.२७ ला दुपारी १२ वाजतापूर्वी आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले. संबंधित नगर पंचायतींच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे उपविभागीय अधिकारी हेच अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीतही पिठासीन अधिकारी राहणार आहे. नगर पंचायतींच्या कार्यालयात बहुमताने ही निवड केली जाणार आहे.
कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे कोणत्या नगर पंचायतीत कोणाची सत्ता बसणार आणि कोणाला विरोधकांची भूमिका वठवावी लागणार याकडे समस्त जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायती बरखास्त होऊन नगर पंचायती अस्तित्वात आल्यापासून प्रशासक कारभार पाहात आहेत. मात्र पुरेसा कर्मचारी वर्ग आणि इतर कामांचा बोझा पाहता नगर पंचायतींमधील अनेक कामे रखडली आहेत. ही रखडलेली कामे मार्गी लागावी यासाठी पदाधिकारी सत्तारूढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक लवकर घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला.
चारपैकी तीन नगर पंचायतींवर महिला सदस्य अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. कोणताही अनुभव नसताना या महिला नगर पंचायतींची धुरा कशा सांभाळतात याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सदस्य जाणार सहलीवर?
चारही नगर पंचायतीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्तेचे जुगाड जमविण्यासाठी सदस्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. आता प्रत्यक्ष सत्तारूढ होण्याची तारीख जाहीर झाल्यामुळे संख्याबळाचे गणित जमविलेल्या पक्षाच्या सदस्यांना एकत्रितपणे सहलीवर अज्ञात ठिकाणी पाठविले जाण्याची शक्यता आहे. ऐनवेळी सत्तेचा घास कोणी हिरावू नये यासाठी ही खबरदारी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
अर्जुनी मोरगाव येथे अनुसूचित जाती महिला, सडक अर्जुनी अनुसूचित जाती (सर्वसाधारण), देवरीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर गोरेगावात खुल्या प्रवर्गातील महिला नगर पंचायत अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. या महिलांना केवळ नामधारी ठेवून स्वत: कारभाराची सूत्रे हलविण्याचे काही दिग्गजांचे मनसुबे निवडणुकीत हार खावी लागल्याने धुळीस मिळाले. मात्र नामनिर्देशित सदस्यांच्या रूपाने त्यांना सत्तेचे भागीदार होण्याची संधी असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काही लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.