२७६ स्रोत भागविणार वन्यप्राण्यांची तहान
By Admin | Updated: March 1, 2017 00:18 IST2017-03-01T00:18:40+5:302017-03-01T00:18:40+5:30
नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यासह वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अभयारण्यात ८ हजार ९३० वन्यप्राण्यांची संख्या

२७६ स्रोत भागविणार वन्यप्राण्यांची तहान
३ वाघ २० बिबट : रानगव्यांची संख्या जास्त
गोंदिया : नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यासह वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अभयारण्यात ८ हजार ९३० वन्यप्राण्यांची संख्या असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी २७६ स्त्रोत आहेत. या स्त्रोतातून वन्यप्राण्यांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. पाण्यासाठी अनेक ठिकाणी सोलरपंप लावण्यात आले आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या वन्यजीव उपवनसंरक्ष कार्यालयामार्फत नागझिरा अभयारण्य, पिटेझरी, उमरझरी, डोंगरगाव, बोंडे, कोका वन्यजीव अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान असे सात ठिकाण या विभागाकडे येत आहेत. या सात परिसरातील जंगलात असलेल्या वन्यजीवांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यासाठी ९७ नैसर्गिक पाणवठे आहेत. परंतु ही पानवठे वन्यप्राण्यांसाठी पुरेसे नसल्याने विविध ठिकाणी १३१ कृत्रीम पानवठे तयार करण्यात आले आहेत, तर ४८ खोदतळे तयार करण्यात आले.
वन्यप्राण्यांची तहान भागविता यावी यासाठी ७१ पाणवठ्यावर सोलरपंपची व्यवस्था करण्यात आली असून सर्व पंप सुरळीत सुरु असल्याची माहिती देण्यात आली. या परिसरात ३ वाघ, २० बिबट, १५६ अस्वल, ४ लांडगे, २७७ रानकुत्रे, २ कोल्हे, ३ खवले मांजर, २१ मुगूंस, १ मुसम्याउद, ६ रानमांजर, १० सायाळ, ११७३ रानडुक्कर, १०९२ रानगवे, ९१३ चितळ, ३९६ निलगाय, ३४३ सांबर, १३३ भेडकी, ४ ससे, काळे तोंड असलेले ३ हजार ७७४ माकड, लालतोंडाचे ३१० माकड, २८८ मोर, १ रानकोंबडा असे एकूण ८ हजार ९३० वन्यप्राणी आहेत. या वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय वनविभागाने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिकाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर
उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असल्याने त्या वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्या सक्रिय होतात. पाण्यात विष टाकून वन्यप्राण्यांची शिकार करण्याचेही प्रयोग होतात. पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये यासाठी कॅमेरे ही बसविण्यात आले आहेत.