कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला २७०० हजार लग्नाचा बार (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST2021-04-19T04:26:32+5:302021-04-19T04:26:32+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग सन २०२० मध्ये सुरू झाल्याने तीन महिने सतत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु कोरोना ...

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला २७०० हजार लग्नाचा बार (डमी)
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग सन २०२० मध्ये सुरू झाल्याने तीन महिने सतत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु कोरोना जसाजसा कमी होऊ लागला तसातसा लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. लग्नसमारंभाला मंजुरी देण्यात आली. ५० लोकांच्या आतच लग्न समारंभ करा असे आदेश शासन, प्रशासनाने दिले. परंतु या आदेशाचा गैरफायदा घेत लग्नाचा बारच फुटला. सुरुवातीला काहींनी परवानगी घेतली. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी परवानगी न घेताच ५०० ते १००० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ केले.
दररोज लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथी, ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. गोंदिया जिल्ह्यातील ९३६ गावांपैकी असा एकही गाव शिल्लक नाही त्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. जोमाने लग्न समारंभ पार पाडण्यात आले. डिजे, ढोल यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यांतील प्रत्येक तालुक्यात शेकडोच्या वर लग्न झालीत. या लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी आज कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे.
.....
बॉक्स
रजिस्टर्ड लग्नाकडे कुणी भटकलेच नाहीत
कोरोनाच्या काळात कमी पैशात लग्न करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु रजिस्टर्ड लग्न करणाऱ्यांची संख्या गोंदिया जिल्ह्यात नाही. सर्वसामान्यांसाठी न्यायालय बंद असल्याने कुणीही रजिस्टर्ड विवाह करण्यासाठी कुणीच पुढे आला नाही. सर्वांनी कमी खर्चात कमी लोकांत लग्न करणे पसंत केले.
.........
बॉक्स
एप्रिल कठीणच
मागील वर्षापासून यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत झालेल्या लग्न समारंभामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ही परिस्थती सावरणे आता एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात ४ एप्रिलपासूनच सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली तरीही लोक लग्न समारंभ करीतच आहेत.
......
मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया
१) कोरोनाच्या संसर्गामुळे दरवर्षीच्या तुलनेत अर्धेही लग्न समारंभ आमच्याकडे झाले नाहीत. ५० लोकांच्या आतच लग्न आटोपण्याचा सरकारचा आदेश असल्याने लोकांनी मंगल कार्यालय करण्यापेक्षा घरीच लग्न करणे पसंत केले आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला आहे.
- कैलास शेंडे, मंगल कार्यालय चालक
.....
२) कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लग्न समारंभात वऱ्हाड्यांची घालून दिलेली अट ही मंगल कार्यालयात लग्न करण्यासाठी कारणीभूत ठरली. कमी लोकांत लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करावे असे लोकांना वाटले. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले, त्यामुळे लागत लावलेली रक्कम निघाली नाही.
- पुष्पकांत बहेकार, मंगल कार्यालय चालक, आमगाव