आपत्तीग्रस्तांना २.७० कोटी मंजूर

By Admin | Updated: April 10, 2017 01:16 IST2017-04-10T01:16:25+5:302017-04-10T01:16:25+5:30

आ. गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने राज्य मंत्रिमंडळाच्या समितीत मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

2.70 crores approved for disaster victims | आपत्तीग्रस्तांना २.७० कोटी मंजूर

आपत्तीग्रस्तांना २.७० कोटी मंजूर

नुकसानभरपाई : मंत्रिमंडळाच्या उपसमितीत निर्णय
गोंदिया : आ. गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने राज्य मंत्रिमंडळाच्या समितीत मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात मे २०१६ मध्ये गोंदियात आलेल्या चक्रीवादळातील आपत्तीग्रस्तांना २.७० कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता लवकरच मागील वर्षभरापासून प्रलंबित आपत्तीग्रस्तांचे प्रकरण मार्गी लागतील.
बैठकीत प्रामुख्याने आ. गोपालदास अग्रवाल, समितीचे सदस्य सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे तथा ग्रामीण विकास मंत्रालय, जलसंधारण मंत्रालय, मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मे २०१६ मध्ये गोंदिया जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळामुळे अनेक क्षेत्रात पीक, पशुधन व घरांचे मोठेच नुकसान झाले होते. आ. अग्रवाल यांनी स्वत: प्रत्येक गावाचा दौरा करून नुकसानीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविले होते. चक्रीवादळामुळे प्रामुख्याने गोंदिया तालुक्यातील बनाथर, बिरसोला, वडेगाव, धामनगाव, कोरणी, काटी, सतोना, नवरगावकला, मुंडीपार, दांडेगाव, मजितपूर, गंगाझरी, एकोडी, इर्री, नवरगाव खुर्द, मोरवाही आदी गावे प्रभावित झाले होते. या आपत्तीग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जवळपास ३ कोटी रूपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव आ. अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाद्वारे राज्य शासनास मंजुरीसाठी पाठविला होता.
विशेष म्हणजे सदर चक्रीवादळामुळे आपत्तीग्रस्त शासनाने आर्थिक मदत देण्याच्या नियमात बसत नसल्यामुळे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नव्हता. त्यामुळे मागील आठ-दहा महिन्यांपासून आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित होते. या संदर्भात आ. अग्रवाल यांनी २३ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना आपत्तीग्रस्तांना त्वरित तीन कोटी रूपयांची आर्थिक मदत मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने निधी जारी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र वित्त विभागाने प्रस्तावास मंजुरी दिली नव्हती.
याबाबत आ. अग्रवाल यांनी २३ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना, त्यांच्या निर्देशानंतरही अधिकाऱ्यांद्वारे मदत निधी मंजूर करीत नसल्याचे सांगून तात्काळ आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन सचिवांसह फोनवर चर्चा करून त्वरित आर्थिक मदत मंजूर करण्याचे निर्देेश दिले. परंतु काहीही परिणाम न निघाल्याने राज्य विधानसभेच्या सुरू बजेट सत्रात आ. अग्रवाल यांनी सदर मुद्याचा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून पुन्हा शासनापुढे मांडला. यावर शेवटी शासनाने सकारात्मक निर्णय घेवून गोंदिया तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २.७० कोटी रूपयांचा अनुदान मंजुर केला.
त्यांच्या या कार्याबद्दल जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, सभापती पी.जी. कटरे, झामसिंग बघेले, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर, बनाथरचे ज्येष्ठ नागरिक क्रांतिकुमार चव्हाण यांनी आ. अग्रवाल यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: 2.70 crores approved for disaster victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.