२५० रूपयांची लाच भोवली
By Admin | Updated: February 25, 2015 00:12 IST2015-02-25T00:12:51+5:302015-02-25T00:12:51+5:30
घरकूल योजनेचे धनादेश देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास रंगेहात पकडले.

२५० रूपयांची लाच भोवली
गोंदिया : घरकूल योजनेचे धनादेश देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी १२.४० वाजतादरम्यान सालेकसा येथील पंचायत समिती कार्यालयात ही कारवाई केली. नामदेव सापकुजी भांडारकर (५६,रा.कट्टीपार) असे लाचखोर अभियांत्रिकी सहायकाचे नाव आहे.
तक्रारदार हे हातमजूर असून त्यांना सन २०१४ मध्ये शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाकरिता एकूण १ लाख १० हजार रूपये सालेकसा पंचायत समितीकडून मंजूर करण्यात आले. त्यांना आॅक्टोबर २०१४ मध्ये ३७ हजार ५०० रूपयांचा पहिला धनादेश मिळाला होता. मात्र त्यासाठी त्यावेळी बांधकाम विभाग लिपीक भांडारकर याने एक हजार रूपयांची लाच घेतली होती. दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन दुसऱ्या धनादेशाबाबत माहिती घेतली. यावर मात्र भांडारकर याने धनादेश देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी करीत अन्यथा धनादेश मिळणार नाही असे स्पष्ट केले. यावर तक्रारदारांनी त्याला नाईलाजाने २५० रूपये दिले. तसेच उर्वरीत २५० रूपये देऊन धनादेश घेऊन जाण्याचे ठरले.
मात्र तक्रारदारास लिपीक भांडारकर यास लाच द्यायची नसल्याने त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पथकाने २४ फेब्रुवारी रोजी सालेकसा पंचायत समितीच्या बांधकाम विभाग कार्यालयात सापळा लावला व लिपीक भांडारकर यास पंचांसमक्ष २५० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. भांडारकर विरोधात सालेकसा पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७,१,३ (१)(ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपअधिक्षक दीनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, हवालदार दीपक दत्ता, नायक पोलीस शिपाई राजेश शेंद्रे, डिगंबर जाधव, रंजीत बिसेन, वंदना बिसेन यांनी केली.(शहर प्रतिनिधी)