२५ ई-रिक्षा धावतात रस्त्यावर
By Admin | Updated: August 28, 2016 01:00 IST2016-08-28T01:00:25+5:302016-08-28T01:00:25+5:30
महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात सर्रास धावताहेत

२५ ई-रिक्षा धावतात रस्त्यावर
नरेश रहिले गोंदिया
महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात सर्रास धावताहेत. अशाच दोन रिक्षांना परिवहन विभागाने पकडले असून अन्य रिक्षांवरही कारवाई केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात २५ ई-रिक्षा धावत असल्याची माहिती आहे.
बॅटरीवर चालणारे ई-रिक्षा दिल्लीत प्रकरणाने गाजले. त्यानंतरही महाराष्ट्रात या ई-रिक्षाला बंदी होती. मात्र प्रायोगिक तत्त्वावर नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती या ठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात आले. परंतु हे ठिकाण वगळले तर अख्या महाराष्ट्रात ई-रिक्षाला बंदी असताना गोंदिया व तिरोडा येथे ई-रिक्षा विक्रीची दुकाने थाटून हे वाहन विक्री केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २५ ई-रिक्षा धावत असल्याची माहिती परिवहन विभागामार्फत मिळाली.
राज्य शासनाची या ई-रिक्षांना मंजूरी नाही, त्यांची नोंदणी झाली नसून क्रमांक नसताना रस्त्यावर बिनधास्तपणे हे वाहन चालविले जात आहे.
या वाहनचालकांनी अपघात करून वाहन पळवून नेले तर त्यांना शोधणे अत्यंत कठीण होणार आहे. अनाधिकृतपणे हे रिक्षा जिल्ह्यातील रस्त्यांवर बिनधास्तपणे धावत आहेत. यावर कारवाई होणार आहे. असेच रस्त्यावर विनाक्रमांक धावणाऱ्या दोन रिक्क्षांना गोंदिया व तिरोडात जप्त करण्यात आले आहे.
परिवहन विभागाची पोलिसांत तक्रार
बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात धावत असल्याने दोन ईरिक्षावर कारवाई करून एक वाहन तिरोडा पोलीस ठाण्यात तर दुसरे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लावण्यात आले आहे. जप्त केलेल्या त्या वाहनांना सोडण्यासाठी नागपूर येथून परिवहन विभागाचे कर्मचारी मांडवेकर यांना मंगळवारी फोन आला होता. ते वाहन न सोडल्यास तुम्हाला व तुमच्या अधिकाऱ्यांना ठार करू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार परिवहन विभागाने शहर पाोलिसांकडे केली आहे.
ई-रिक्षावर गोंदियात बंदी असताना अनाधिकृतपणे कुणीही ई-रिक्षा खरेदी करू नये अन्यथा तुमचे नुकसान होईल. नोंदणी होत नसलेली वाहने रस्त्यावर चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. ई-रिक्षाला बंदी असल्यामुळे नागरिकांनी स्वत:चे आर्थिक नुकसान करू नये.
-विजय चव्हाण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया.