गुप्तधनाच्या नावे २.४० लाखांनी गंडविले
By Admin | Updated: July 15, 2016 02:02 IST2016-07-15T02:02:11+5:302016-07-15T02:02:11+5:30
घरात भरपूर गुप्तधन असल्याचे सांगून व ते काढण्यासाठी खर्च येईल, असे भासवून भोंदू वैद्याने दवनीवाडा येथील एका दाम्पत्यास....

गुप्तधनाच्या नावे २.४० लाखांनी गंडविले
दोघांना अटक : दोन फरार आरोपींचा शोध सुरू
गोंदिया : घरात भरपूर गुप्तधन असल्याचे सांगून व ते काढण्यासाठी खर्च येईल, असे भासवून भोंदू वैद्याने दवनीवाडा येथील एका दाम्पत्यास दोन लाख ४० हजार रूपयांनी गंडविले. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर दोन आरोपी अद्यापही फरारच आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दवनीवाडा येथील सेवकराम शिवचरण देहारे (३८) यांच्या पत्नीला मुलबाळं होत नव्हते. त्यामुळे सावंगाफाटा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील शंकर वैद्य उर्फ भोलाशंकर रूपचंद सोलंकी (७०) याच्याकडून ती जडीबुटी औषध जानेवारी २०१६ पासून घेत होती. त्या दरम्यान शंकर त्यांच्या घरी आला व तुमच्या घरी मालदेव असून भरपूर गुप्त धन आहे. मी पायारू असून मला माहिती आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी तुला ८० हजार रूपयांचा खर्च येईल, असे सांगितले.
यानंतर त्यांच्याकडून पैसा घेवून आपल्या सोबत्यासह येवून शंकरने पूजापाठ केली व जमिनीतून तांब्याचा एक लहान हंडा काढला. त्याची पूजापाठ करण्यास लावून गुप्त धनाची लालच व देवाची भीती दाखवून चमत्कार होईल, असे भासविले. तेव्हापासून फेब्रुवारी २०१६ पर्यंत सदर दाम्पत्याकडून भोंदूबाबा शंकरने दोन लाख ४० हजार रूपये घेवून त्यांची फसवणूक केली.
आरोपींमध्ये भोलाशंकर सोलंकीसह त्याचा मुलगा चांदगीर सोलंकी (२०), रंगलाल उर्फ संजय श्रीराम गुंदी (३०) रा. वारंगा-बुटीबोरी (नागपूर) व त्याचा लहान भाऊ लखन श्रीराम गुंदी (२८) यांचा समावेश आहे. यातील भोलाशंकर सोलंकी व लखन गुंदी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित दोन आरोपी अद्यापही फरारच आहेत. (प्रतिनिधी)