रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना २३पर्यंत पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:21+5:302021-04-23T04:31:21+5:30
गोंदिया : कोविड रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करण्यात येत होती. हे रेमडेसिविर इंजेक्शन चक्क गोंदियाच्या ...

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना २३पर्यंत पीसीआर
गोंदिया : कोविड रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करण्यात येत होती. हे रेमडेसिविर इंजेक्शन चक्क गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून काळ्याबाजारात विक्रीसाठी जात होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी संजू विकास बागडे, दर्पण नागेश वानखेडे, नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे (सर्व रा. गांधीवाॅर्ड, गोंदिया) या तिघांना २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोंदियात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनअभावी कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा कमविण्याच्या नादात असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. एका इंजेक्शनचे १५ हजार रुपयांप्रमाणे दोन इंजेक्शनचे ३० हजार रुपयात विक्री केली जात होती. त्या आरोपींनी गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून ह्या रेमडेसिविर इंजेक्शन आणल्याचे सांगितले. या प्रकरणात औषध निर्माण अधिकारी, परिचारिका की डॉक्टर कोण दोषी आहेत या बाजूने पोलीस तपास करीत आहेत. आरोग्य विभागाच्या कोणत्याही कर्मचारी, अधिकाऱ्याला अद्याप अटक झाली नसली तरी ती अटक अटळ असल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश बनसोडे करीत आहेत. आरोपी संजू विकास बागडे, दर्पण नागेश वानखेडे, नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे (सर्व रा. गांधी वाॅर्ड, गोंदिया) या तिघांविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, १८८, ३४सह परिशिष्ट २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३(क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख), (दोन) औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात विविध बाजू पुढे येणार आहेत.