२१ विदेशी पर्यटकांची व्याघ्र प्रकल्पाला भेट
By Admin | Updated: November 30, 2014 23:05 IST2014-11-30T23:05:47+5:302014-11-30T23:05:47+5:30
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे

२१ विदेशी पर्यटकांची व्याघ्र प्रकल्पाला भेट
प्रचार-प्रसाराचा अभाव : जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
कपिल केकत - गोंदिया
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे की, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली अभयारण्यात २१ हजारच्या वर विदेशी पर्यटक भेट देत आहेत. तर गोंदियातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला या वर्षात फक्त २१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. यातून वन विभागासह जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याची वाघाची गुहा म्हणून ओळख आहे. पर्यटक येथे आल्यास वाघोबाचे हमखास दर्शन होतेच असा अनुभव आहे. हीच बाब हेरून शासनाने १२ डिसंबर २०१३ नागझिराला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देत नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा केली. ६५३.६७ स्क्वेअर किमी. क्षेत्र असलेल्या या जंगलात वाघोबांचा वास आहे व त्याचे दर्शनही पर्यटकांना होतात. राष्ट्रीय स्तरावर नागझिराची ओळख व ख्याती असल्याने मोठ्या संख्येत पर्यटक दरवर्षी येथे येतात.
मात्र जागतिक स्तरावर बघायचे झाल्यास नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नसल्याचे दिसते. याचे कारण असे की, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली अभयारण्य प्रख्यात आहे. येथे सन २०१३-१४ या वर्षात २१ हजार १३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती आहे. तर या वर्षात नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला फक्त २१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. यात मे महिन्यात १०, जून महिन्यात एक तर आॅक्टोबर महिन्यात १० विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे, यापूर्वी विदेशी पर्यटक येथे आल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे नाही.
विशेष म्हणजे, कान्हा केसलीला जाण्यासाठी बालाघाट होत जावे लागते. बहुतांश विदेशी पर्यटक अगोदर नागपूरवरून गोंदिया होतच बालाघाट व तेथून कान्हा केसलीला गेले असतील. शिवाय कान्हा केसलीला आल्यावर त्यांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती न मिळणे हीच आश्चर्याची व व्यापक प्रचार-प्रसारातील उणिवेची बाब पुढे येते.
येथून सुमारे १५० किमी. अंतरावर असलेल्या कान्हा केसलीला २१ हजार विदेशी पर्यटक भेट देत असून जवळील व्याघ्र प्रकल्पाबाबत ते येत नसल्याने ते याबाबत अनभिक्ष असल्याचे स्पष्ट होते. अशात येथील वनविभाग व जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. तर राज्य शासन सुद्धा येथे कोठेतरी कमकुवत पडत असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीचे कार्य जिल्हा पर्यटन समितीक डून केले जाते. मात्र एक वर्ष लोटूनही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची जागतिक पातळीवर पाहिजे तशी प्रसिद्धी होऊ शकली नाही यांची खंत ही वाटते.
वनविभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन बुकींगच्या माध्यमातून आता कोठे या व्याघ्र प्रकल्पाबाबत पर्यटकांना माहिती मिळू लागली आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धीसाठी प्रयत्न होऊ शकले नाही व त्यामुळेच व्याघ्र प्रकल्प विदेशी पर्यटक व त्यांच्याकडून येणाऱ्या उत्पन्नापासून मुकला हे सुद्धा तेवढेच खरे आहे.