२० टक्के रोवण्या अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 00:11 IST2016-08-27T00:11:54+5:302016-08-27T00:11:54+5:30

हव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने आजही अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत.

20 percent of the rows are still unfinished | २० टक्के रोवण्या अजूनही अपूर्णच

२० टक्के रोवण्या अजूनही अपूर्णच

नुकसान भरपाई द्या : दिलीप बंसोड यांनी केली पीक पाहणी
काचेवानी : हव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने आजही अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेली खरिपाची शेती पाण्याविहीन कोरडी पडली आहे. माजी आमदार दिलीप बंसोड यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शुक्रवार (दि.२६) पिकांची पाहणी केली. त्यात २० टक्के रोवण्या आजही अपूर्णच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पाण्याअभावी ज्या शेतकऱ्यांनी रोवण्या केल्या नाहीत, त्यांना तपासणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे माजी आमदार बंसोड यांनी सांगितले. आधीच दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाने दगा दिला आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी रोवण्या आटोपल्या आहेत, त्यांच्या शेतातील पिकांना पाण्याची गरज आहे. पाऊस न पडता ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे आक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खुले वातावरण व चांगले पाऊस उत्तम पीक घेण्यासाठी गरजेचे झाले आहे.
यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले. तिरोडा तालुक्यात वडेगाव क्षेत्रात पावसाच्या कमी प्रमाणामुळे अनेक गावांत २० टक्के रोवण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवून आकाशाकडे नजरा वळविल्या आहेत. खोळंबलेल्या रोवण्यांची कृषी विभागाकडून चौकशी करण्यात यावी व त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी बंसोड यांच्याकडे व्यक्त केली आहे.
याप्रसंगी माजी आ. दिलीप बन्सोड यांच्यासह जि.प. सदस्य गीता बिसेन, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, जि.प. सदस्य सुनिता मडावी, पंचम बिसेन, पं.स. सदस्य निता रहांगडाले, पं.स. सभापती उषा किंदरले, रामकुमार असाटी, संभाजी ठाकरे, कैलाश कडव, जीवन गौतम, सूर्यकांता टेंभरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आ. बंसोड यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह तिरोडा तालुक्यातील सर्रा, कोडेलोहारा, कोयलारी, नांदलपार, मुरमाडी, खैरी, कुल्पा, मनोरा, केसलवाडा, सिल्ली, येडमाकोड, माल्ही, नवेगाव, गांगला, लेदडा व घोगरा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. तसेच अपूर्ण रोवणी असलेल्या भागाची पाहणी करण्यात आली.
यावेळी आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून २० टक्के अपूर्ण रोवणी असलेल्या शेतांची पाहणी करून व त्याचे प्रस्ताव तयार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन माजी आ. बंसोड यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: 20 percent of the rows are still unfinished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.