तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाच दिवसांत २० बेड उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:58+5:302021-04-23T04:31:58+5:30
तिरोडा : तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णासाठी केवळ २० बेडची सुविधा ...

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाच दिवसांत २० बेड उपलब्ध
तिरोडा : तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णासाठी केवळ २० बेडची सुविधा असल्याने येथील रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जात होते. दरम्यान, आ. विजय रहांगडाले यांची त्वरित दखल घेत गुरुवारी (दि.२) तातडीने २० बेड उपलब्ध करून दिले. तसेच टेक्निशियनचीसुद्धा व्यवस्था करून दिली आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात आता कोविड रुग्णासाठी ४० बेड उपलब्ध झाले आहेत.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड कमी पडत असल्याची बाब वारंवार आ. विजय रहांगडाले यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. मात्र, यानंतरही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले हाेते. टेक्निशियन नसल्याची बाब पुढे करीत बेड उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान, आ. रहांगडाले यांनी स्वत: पुढाकार घेत गुरुवारी शासन स्तरावर पाठपुरावा करून त्वरित २० बेड्स उपलब्ध करुन दिले. सध्या कोविड रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने येथील ओपीडी सुरू राहणार असून गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी गोंदिया येथे रेफर केले जाणार आहे. तसेच या रुग्णालयातील चार डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर दुसरीकडे पाठविण्यात आले हाेते. मात्र, येथील अडचण लक्षात घेता त्यांना परत पाठविण्यास प्रशासनाला सांगितले. त्यानंतर चारही डॉक्टरांना तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात परत पाठविण्यात आले आहे. आ. विजय रहांगडाले यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स व गोरेगाव ग्रामीण रुग्णालयाकरिता ३० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स खरेदी करण्याकरिता ६६ लक्ष ४० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आ. रहांगडाले यांनी कळविले आहे. दरम्यान, आयोजित आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी अजय नाष्टे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदुरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकिशोर पारधी, न. प. तिरोडा मुख्याधिकारी अर्चना मेंढे, तालुका वैद्यकीय अधिकारी शीतल मोहने, नगरसेवक राजेश गुणेरीया, अजय गौर उपस्थित होते.