१९० ब्रास अवैध मुरूम उत्खनन
By Admin | Updated: August 18, 2016 00:15 IST2016-08-18T00:15:55+5:302016-08-18T00:15:55+5:30
येथील शासकीय जागेतील गट क्रमांक ६८ आराजी मधील मुरूम अवैधपणे उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

१९० ब्रास अवैध मुरूम उत्खनन
बाराभाटी : येथील शासकीय जागेतील गट क्रमांक ६८ आराजी मधील मुरूम अवैधपणे उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ५० ब्रास मुरुमाऐवजी २४० ब्रास उत्खनन करण्यात आले. त्यामुळे विनारॉयल्टी १९० ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे दिसून आले.
१६ आॅगस्ट रोजी सकाळी गट क्रमांक ६८ या जागेतील मुरूम ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. पोलिसांनी दोन ट्रॅक्टरमध्ये मुरूम भरत असताना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांना रोखले. या गट क्रमांकातून ४ ते १६ आॅगस्ट २०१६ पर्यंत खनिज परवाना होता. मात्र मौका ठिकाणी चौकशी करतांना २४० ब्रास मुरूम उत्खनन दिसले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच सदस्य उपस्थित होते. उत्खनन करताना रॉयल्टी परवाना नव्हता. सदर उत्खनन मुरूमापैकी काही मुरूम गावातील रस्त्यावर, जि.प.शाळेत, अंगणवाडी या ठिकाणी टाकल्याचे दिसते. तर काही मुरूमाच्या ट्रिप बाहेरगावाला विकल्याचे गावकरी सांगतात.
मुरूम भरताना दोन ट्रॅक्टर हजर होते. त्यांच्यावर सुध्दा कारवाई होणार व तीन पट दंड वसूल होणार असे उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी सांगितले. या प्रकरणाचा पंचनामा डब्ल्यू.एफ.कोहाडकर, मंडळ अधिकारी व तलाठी लालेश्वर टेंभरे यांनी केला.
यावेळी सरपंच अनिता खोब्रागडे, उपसरपंच श्रावण मेंढे, ग्रामसेवक (सचिव) परमेश्वर नेवारे, शिलेन नशीने, ईश्वर बेलखोडे, वाल्मीक खोब्रागडे, विलास बन्सोड आदी उपस्थित होते.(वार्ताहर)