१९ जोडपी विवाहबद्ध
By Admin | Updated: April 26, 2017 00:53 IST2017-04-26T00:53:02+5:302017-04-26T00:53:02+5:30
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा घेऊन माळी समाज स्वत:च्या

१९ जोडपी विवाहबद्ध
सहषराम कोरोटे : घोनाडी क्षेत्रात लिफ्ट इरिगेशन व बँक शाखेची त्वरित व्यवस्था करा
देवरी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा घेऊन माळी समाज स्वत:च्या परिश्रमाच्या भरवश्यावर व्यवसायीक शेती व लहानसहान गृहउद्योग करुन आपला परिवार आणि समाजाला पुढे नेण्याचे काम करीत आहे. एक नवीन ओळख निर्माण करण्याचे काम माळी समाज करीत आहे. परंतु घोनाडी क्षेत्रातील शेतकरी व शेतमजूर नैसर्गिक दुष्काळात सिंचनाअभावी आर्थिक अडचणीला सामोरे जात आहे. अनेक वर्षापासून या भागात एक लिफ्ट इरीगेशनची आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्याकरिता बँक शाखेची येथील लोकांची मागणी आहे. या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा करुन येथील लोकप्रतिनिधींनी त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे.
कोरोटे हे घोनाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास संस्थेद्वारे रविवार (ता.२३) आयोजित १९ वर-वधू जोडप्यांच्या आदर्श सामूहिक विवाह सोहळ्यात अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते.
दीप प्रज्वलन करून उद्घाटन आमदार संजय पुराम यांनी केले. अध्यक्षस्थानी विदर्भ माळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र महाडोरे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे, एपीओ कॅम्प बोंडेचे पोलीस निरीक्षक काळे, देवरीचे बँक व्यवस्थापक सोभा गुरनुले, तालुका भाजपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, घोनाडीचे सरपंच शालीकराम गुरनुले, पोलीस पाटील दयाराम पंधरे, पालांदूर (जमी) चे तंटामुक्त समिती अध्यक्ष भास्कर निकोडे, माजी सभापती कामेश्वर निकोडे, सिंगनडोहचे मनोहर मिरी, माळी समाजाचे तालुकाध्यक्ष यशवंत गुरनुले यांच्यासह माळी समाजातील गावागावातून शेकडोच्या संख्येत महिला, पुरूष व युवक मंडळी उपस्थित राहून या विवाह सोहळ्यातील १९ नवजोडप्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा देऊन आपले आशीर्वाद दिले.
कोरोटे पुढे म्हणाले, देवरी तालुक्यातील दुर्गम भाग घोनाडी या क्षेत्रात मोठ्या संख्येत माळी समाज राहतो आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आहे. आपल्या शेतातून पारंपरिक पद्धतीने शेती उद्योगाचे काम करतो. परंतु नैसर्गिक दुष्काळात सिंचनाअभावी या समाजाला खूप हालअपेष्टा सहन करावे लागते. अशा परिस्थितीत शासनाकडून कसलीही आर्थिक मदत नाही आणि सिंचनाकरिता पाण्याची सोय नाही, अशा दुहेरी समस्येत या भागातील शेतकरी व शेतमजूर आपले जीवन जगत आहेत. त्याचप्रमाणे या भागात दैनंदिन देवाणघेवाणचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपले कामधंदे सोडून चिचगड किंवा देवरीला जावे लागते. अद्याप या भागात कोणात्याही बँकेने आपली शाखा उघडलेली नाही. या दोन्ही समस्येबाबद अनेक वर्षापासून येथील लोक अनेक वर्तमानपत्र व शासनकर्त्यांना निवेदनातून कळविण्यात आले. तरी सुद्धा या गंभीर मुद्याकडे कोणात्याही लोकप्रतिनिधींनी अद्याप लक्ष दिलेले नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. शासनकर्त्यांनी या भागात एक लिफ्ट इरीगेशन व बँक शाखेचे शुभारंभ त्वरित करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे.
प्रास्ताविक सुदाम मोहुर्ले यांनी मांडले. संचालन झाशीनगरचे समाज अध्यक्ष डॉ. यशवंत गुरनुले यांनी केले. आभार घोनाडी समाजाचे उपाध्यक्ष विनोबा लेंडे यांनी मानले.(प्रतिनिधी)