पेट्रोल पंपावरील ‘त्या’ १८ कर्मचाऱ्यांची उपासमार

By Admin | Updated: April 26, 2016 01:41 IST2016-04-26T01:41:32+5:302016-04-26T01:41:32+5:30

तब्बल २० वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर १२-१२ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पगार देण्याची मागणी

18 workers' hunger strike on petrol pump | पेट्रोल पंपावरील ‘त्या’ १८ कर्मचाऱ्यांची उपासमार

पेट्रोल पंपावरील ‘त्या’ १८ कर्मचाऱ्यांची उपासमार

गोंदिया : तब्बल २० वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर १२-१२ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पगार देण्याची मागणी करताच त्यांना एका झटक्यात कामावरून काढून टाकण्याचा प्रकार स्थानिक प्रभात टॉकीजसमोरील भारत पेट्रोलियम पंपावर (नाईस आॅटो सेंटर) घडला.
या प्रकाराची तक्रार त्या कर्मचाऱ्यांनी सहायक कामगार आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधितांकडून दाद न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिला.
आपली व्यथा मांडताना या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते गेल्या १५ ते २० वर्षांपासून या पेट्रोल पंपावर काम करीत आहेत. त्यांना आता अवघा ४ हजार रुपये महिना वेतन दिले जाते. मात्र रजिस्टरवर सही घेताना तिथे हा आकडा टाकला जात नाही. वास्तविक पेट्रोल कंपनीच्या नियमानुसार किमान वेतन २८१ रुपये प्रतिदिवस असायला पाहीजे. वाढती महागाई पाहता या पंपावरील सर्व १८ कर्मचाऱ्यांनी पंपाचे संचालक पुरूषोत्तम मोदी यांच्याकडे वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्यांनी त्यांची काहीही ऐकून न घेता दुसऱ्या दिवशीपासून कामावर येऊ नका असे सांगितले. दुसऱ्या दिवशी हे कर्मचारी गेले असता त्यांना कामावरून काढल्याचे सांगून काम करण्यास मज्जाव केला.सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी यासंदर्भात दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सदर कर्मचारी व पेट्रोल पंपाचे संचालक मोदी यांना बोलविले. मात्र मोदी अनुपस्थित राहीले. आता त्यांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. नियमानुसार केलेल्या मागणीचे हे फळ मिळाल्यामुळे आज आमच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे. आम्हाला पूर्ववर कामावर घ्यावे आणि नियमानुसार वेतन, कामाच्या वेळा ठरवून द्याव्या, अशी मागणी भीमराज घोडेस्वार, सुशील सूर्यवंशी, चंद्रपाल भगत, देवेंद्र राणे, राधेश्याम कोरे, दिनेश मानकर, सुनील श्यामकुवर, खेमराज घोडेस्वार, संतोष मेश्राम, राजा गजभिये, पवन बोकडे, शुभम पहिरे, ओमप्रकाश मिसार, राहुल गोंडाने, सिद्धार्थ भालाधरे, कैलास मानकर, रविंद्र बोपचे व गौरी राणे यांनी केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

मी कोणालाही कामावरून काढले नाही. कोणी येत आहे, कोणी नाही येत आहे. दि.५ ला सहायक कामगार आयुक्तांनी मला बोलावले आहे. त्यांच्यासमोर मी आपले म्हणणे मांडेल.
- पुरूषोत्तम मोदी
संचालक, मोदी पेट्रोल पंप

Web Title: 18 workers' hunger strike on petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.